Kolhapur News : 'हम दो हमारे दो' वरून 'हम दो हमारा एक' आणि फ्लॅट संस्कृतीने अनेक पोटच्या दिवट्यांना जन्मदाते नकोसे झाल्याने आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक मातापित्यांना वृद्धाश्रमात मृत्यूची वाट पाहत दिवस घालवावे लागतात. महानगरांपासून ते छोट्या शहरापर्यंत ते गावापर्यंत गेल्या काही दिवसांपासून हेच चित्र दिसून येत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जानकी वृद्धाश्रमात जीवन व्यतित करताना एक सहारा मिळाला आणि वृद्ध जोडपं विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना घडली. या वृद्ध जोडप्याला एकमेकांचा आधार मिळाल्याने त्यांचा उर्वरित आयुष्यातील संसाराला सुरुवात झाली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृध्दांनी वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुमधडाक्यात लग्न लावून दिले. 


अनुसया शिंदे (वय 70 मुळ रा.वाघोली, जि.पुणे) अशी वृध्द नववधू तर वराचे बाबूराव पाटील (वय 75, रा. शिवनाकवाडी, ता.शिरोळ जि. कोल्हापूर) नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात राहतात. शरीराने स्वावलंबी असले, तरी मानसिकदृष्ट्या खचलेल्या स्थितीत होते. दोघांचेही साथीदारांचे निधन झालं आहे. त्यामुळे या समदुःखी वृध्दांनी एकमेकांच्या आयुष्यातील दुःखाचा पाढा वाचून मनमोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.


दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेवून वृध्दाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली. या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीर सुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. उर्वरित आयुष्यात सुख दुःखात सहभागी होवून एकमेकांना मायेचा आधार असावा इतकीच माफक अपेक्षा या वृध्द जोडप्यांना आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


आई मी तुला नाहीच असं समज आणि लग्नाला उभं राहा! कोल्हापुरात मुलानं लावून दिलं विधवा आईचं दुसरं लग्न; राजर्षी शाहूंच्या नगरीत आणखी एक पुरोगामी पाऊल