Hasan Mushrif v/s Samarjeetsinh Ghatge : आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांच्यामध्ये शाब्दिक हमरीतुमरी सुरुच आहे. समरजित यांनी सभासदांचा पैसा कुठं गेला, अशी विचारणा केल्यानंतर मुश्रीफ यांनीही समरजित घाटगे यांनी केलेली वक्तव्ये दिशाभूल करणारी व लोकांच्या मनात गैरसमज पसरवणारी असल्याचे म्हटले आहे. समरजितसिंह घाटगे यांनी काल (25 फेब्रुवारी) सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावरून पुन्हा एकदा तोफ डागली. ते म्हणाले की, मुश्रीफ साहेब 40 हजार शेतकऱ्यांचे चाळीस कोटी कोठे गेले. मुश्रीफ साहेबांनी शेतकऱ्यांना खोट्या पावत्या दिल्या. कारखान्यासाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता. आता 16 पुढे आले आहेत, उद्या 40 हजार शेतकरी बाहेर पडतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कारखान्याचे मालक म्हणून हसन मुश्रीफ आणि त्यांचे नातेवाईक कागदोपत्री दिसून येत आहे, मग 40 हजार शेतकरी कुठे गेले याची माहिती द्यावी. 


या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनीही प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना व शाहू दूध संघाबद्दल समरजित घाटगे यांनी केलेली विधाने दिशाभूल आणि लोकांच्या मनात गैरसमज पसरवणारी आहेत. मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात मला अडकवून टाकण्याचे इराद्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट होतो. मी गेली 35 ते 40 वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. गोरगरीब जनतेचे प्रेम आणि विश्वासार्हता मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळाले आहे. कुणी काही आरोप करून खोटे गुन्हे दाखल करून ती जाणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.


म्हणून खासगी कारखाना उभा केला


त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आम्हाला सहकारी साखर साखर कारखाना उभा करायचा होता. परंतु, सरकारने सहकारी साखर कारखान्याला बंदी घातली होती आणि शासकीय थककमी न देण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याने आम्हाला खासगी कारखाना उभा करावा लागला. 40 हजार लोकांचे पैसे आणि पाच राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज असे पैसे गोळा करून माझ्या मुलांनी हा साखर कारखाना उभा केला आहे. अवघ्या काही दिवसात 40 हजार शेतकरी 40 कोटी रुपये साखर कारखाने शोभारण्यासाठी देऊ शकतात, यावरून आमची विश्वासार्हता किती आहे हे स्पष्ट होते. 


आम्हालाही शाहू दूध संघाप्रमाणे पैसे उभा करावे लागले


दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू दूध संघ काढायचा आणि समरजित यांना चेअरमन करायचे ठरवले. त्यावेळी पहिल्यांदा एक हजार रुपयांचा शेअर्स त्याप्रमाणे पावत्या दिलेल्या होत्या. त्या पावत्या पुन्हा बदलून त्यांनी पाच हजारांचा शेअर्स केला. पहिल्यांदा केलेला शेअर्स का परत घेतला आणि त्याच्या पावत्या का बदलला? याचेही कारण त्यांना माहित आहे. कारण याच कारणामुळे आम्हालाही शाहू दूध संघाप्रमाणे पैसे उभा करावे लागले. त्यामुळे आज समरजित विचारत आहेत की सभासद कुठे आहे, जनरल बॉडी कुठे आहे, वार्षिक अहवाल कुठे आहे या सगळ्यांची उत्तरे त्यामध्ये आहेत. भागभांडवलदारांचे पैसे कुठे गेले याची सगळी माहिती आम्ही यंत्रणांना दिलेली आहे. समोरासमोर लढण्याची हिंमत नाही, म्हणून अशा कुटनीतीने मला कुठेतरी अडकवायचे आणि अडचणीत आणण्याचे सगळे उद्योग सुरू आहेत. 


अमित शाह नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही देखील भेटतील


दरम्यान, समरजित म्हणाले होते की, 40 हजार शेतकऱ्यांची सर्वसाधारण सभा कधी घेतली याचाही पुरावा त्यांनी द्यावा. दरम्यान मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या सोबतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने सर्व माहिती देण्यासाठी अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. यावरून त्यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, मुश्रीफ साहेब अमित शहा नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही देखील भेटतील. इतकच नाही तर जी-20 परिषदेमध्ये जाऊन कारखान्यासाठी कर्ज मागतील. 


इतर महत्वाच्या बातम्या