Kolhapur Rain Update : कोल्हापुरात (kolhapur News) पंचगंगा नदीने  इशारा पातळी ओलांडली असल्याने शहरातील सखल भागात पुराचे पाणी येत आहे. त्यामुळे कोल्हापूर मनपाकडून (Kolhapur Municipal Corporation) शहरातील 33 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत पंचगंगा तालीम जामदार क्लब परिसरातील 8 कुटुंबांतील 32 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. हे नागरिक आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत. विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत सुतारवाडाजवळील एका कुटुंबातील एका नागरिकाचे स्थलांतर करण्यात आले. या सर्वांना चित्रदुर्गमठ या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. आज अखेर 21 कुटुंबातील 84 नागरिकांचे महापालिकेकडून स्थलांतर करण्यात आले आहे. पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनाही स्थलांतरीत होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.


पंचगंगा रुग्णालय तात्पुरते बंद  


दरम्यान, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत पंचगंगा रुग्णालय कार्यरत आहे. मागील दोन महापुराचा अनुभव पाहता तसेच जिल्ह्यामध्ये संततधार पावसाने यंदाही शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शुक्रवार पेठ येथील महापालिकेचे पंचगंगा रुग्णालय हे पूर प्रभावित क्षेत्रामध्ये येत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. पंचगंगा रुग्णालयातील दाखल सर्व रुग्णांपैकी 10 रुग्णांचा डिस्चार्ज झालेला आहे. उर्वरीत 11 रुग्णांना सावित्रीबाई फुले रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 


नागरी आरोग्य केंद्र क्र. 4 हे केएमसी कॉलेज या ठिकाणी हलविण्यात आले आहे. या ठिकाणी माता बाल संगोपन राष्ट्रीय कार्यक्रम, लसीकरण राबविण्यात येत आहे. पंचगंगा रुग्णालय येथील वॉर्ड दवाखाना हा नरसोबा सेवा दवाखाना या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आला आहे. या ठिकाणी वार्ड दवाखाना सकाळ व सायंकाळी सत्रात सुरु राहणार आहे. पंचगंगा रुग्णालयामध्ये पूराच्या पाण्याची पातळी कमी होईपर्यंत नवीन रुग्ण घेतले जाणार नाहीत, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच रुग्णांनी उपचारासाठी सावित्रीबाई फुले रुग्णालय व सीपीआर रुग्णालय येथे संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी केले आहे.


ही बातमी वाचा: