Almatti Dam : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी पावसाळ्यात नेहमीच चिंतेची बाब ठरणाऱ्या अलमट्टी धरणातून 14 हजार 14690 क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. अलमट्टी धरण व हिप्परगे बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यावर कृष्णा व पंचगंगेची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सिंचन विभागामध्ये समन्वय साधला जात आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज कोल्हापुरात बोलताना सांगितले की, 517.5 मीटर पर्यंत पाणीपातळी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुढे तसा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सध्या तरी कृष्णा नदीची पाणीपातळी कमी असल्याने व पुढील विसर्ग सुरु असल्याने आपल्याला धोका नाही.


कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने अलमट्टी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या धरणात 1 लाख 38 हजार 473 क्युसेकने आव सुरु आहे, तर 14 हजार 690 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. कोल्हापूर तसेच सांगलीतून विसर्ग वाढवण्यासाठी दबाव निर्माण झाल्यानंतर विसर्ग 15 हजारांपर्यंत नेला  आहे. अलमट्टी धरणात 82.51 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 


कोयना धरणातून विसर्ग सुरु 


कोयना धरणातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कालपासून (26 जुलै) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातून सध्या कोयना नदीपात्रात 1050 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. कोयना धरणात 61.30 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 


चांदोली धरणात 81 टक्के पाणीसाठा 


चांदोली धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात 27.86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आज (26 जुलै) धरणातून 2456 क्युसेकने वारणा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून विसर्ग सुरु करण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर स्थिर 


सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर स्थिर आहे. सांगली जिल्ह्यात पावसाने विश्राती घेतली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान, सांगलीमधील 2021मधील महापुराचा अनुभव लक्षात घेत मनपाकडून पुरबाधित होणाऱ्या कुटुंबाना नोटिस बजावल्या आहेत. पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता गृहित धरून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु आहे. दुसरीकडे, पाटबंधारे विभागाने ताकारी व टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातून कृष्णा नदीतील पुराचे पाणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात नेण्यास सुरुवात केली आहे.


एक लाख क्युसेकने विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटकला सूचना द्या


दरम्यान, कोल्हापूरसहसांगली जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता अलमट्टी धरणातून तत्काळ एक लाख क्युसेक्स विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी पाहता 2019 ची महापुराची परिस्थिती टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी कृती समितीने केली आहे. याबाबत समितीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई मेल पाठविला आहे. 


राधानगरी धरण 100 टक्के भरले


धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. आतापर्यंत 5 ( 3, 4, 5, 6 व 7 ) स्वयंचलित दरवाजे उघडली आहेत. धरणातून 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या