कोल्हापूर : घाटामध्ये (Ghat) अपघात होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे. पण तरीही घाटातील अपघातप्रवण क्षेत्रामध्ये योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण यावेळी मात्र एक थरारक अनुभव करुळ घाटामध्ये (Karul Ghat) पाहायला मिळाला. एक आयशर ट्रक थेट घाटाच्या पश्चिमेकडून संरक्षक कठड्यावरच चढला. या ट्रकचा पुढचा भाग हा तरंगत राहिला होता. तर मागचा भाग हा घाटातील रस्त्यावर होता. त्यामुळे हा ट्रक दरीत कोसळण्याचा थोडक्यात बचावला. 


अनेकदा चालकांचं लक्ष नसल्यामुळे किंवा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बरेच भीषण अपघात घाट परिसरामध्ये होतात. बऱ्याचदा या अपघातांमध्ये मोठी जीवितहानी देखील होत असल्याचं पाहायला मिळतं. पण तरीही चालकांकडून तर कधीतरी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या अपघातात अनेक निष्पाण जिवांचा बळी जातो. पण सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. त्यामुळे अगदी थोडक्यासाठी मोठा अपघात होता होता राहिला. 


नेमकं काय घडलं?


कोकणातील गगनबावडा येथून कोल्हापूरकडे एक ट्रक निघाला होता. करुळ घाटातील रस्ता हा खड्डेमय आहे. याबाबत बऱ्याचदा प्रशासनाकडे तक्रार देखील दाखल करण्यात आल्या आहेत. परंतु तरीही या रस्त्यावरचे खड्डे काही केल्या कमी होत नसल्याचं पाहायला मिळतयं. याचाच परिणाम या दुर्घटनेवर झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा ट्रक जात असताना तो थेट घाटावरील संरक्षक कठड्यावरच गेला. सोमवार (2 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी साडे पाच वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. 


यावेळी घाटातून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी आणि चालकांनी तात्काळ त्यांची वाहनं बाजूला सारुन या ट्रककडे धाव घेतली. तर या प्रवाशांनी ट्रकला दोरखंड बांधून दुसऱ्या ट्रकच्या साहाय्याने त्याला बाहेर काढायला सुरुवात केली. अनेकांनी जोर लावल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आहे आणि ट्रक बाहेर ओढून काढला. दरम्यान यामुळे ट्रकचा अपघात होण्यापासून थोडक्यात राहिल आणि हा ट्रक सुखरुप बाहेर आला. 


घाटातील वाहतूक सुरळीत


पण हे सगळं होईपर्यंत घाटामधील वाहतूक खोळंबली. कोकणातून कोल्हापूरला जाण्यासाठी या घाटाचा वापर वाहतूकीसाठी केला जातो. दरम्यान या वेळात या घाटामध्ये थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. पण लोकांच्या प्रयत्नांने आणि सहकार्याने ही वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. 



हेही वाचा : 


Nanded : चोवीस रुग्णांचा मृत्यूनंतर आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ, रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज; अशोक चव्हाणांची रुग्णालयास भेट