कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksbha election 2024) संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksbha) गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली चर्चा पुन्हा एकदा रुळावर आली आहे. महायुतीकडून विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार असले, तरी त्यांची अजून कोणतीही शाश्वती नाही किंवा त्याबाबत स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही उमेदवारीवरून अजूनही संभ्रमावस्था आहे. मात्र, अचानक गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा शिगेला पोहोचली आहे. 


संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढवण्याची स्पष्ट संकेत दिल्यानंतर कोल्हापूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी संभाजीराजे यांचं स्वागतच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये उमेदवार चाचणी सुरू झाली आहे, असंच एकंदरीत चित्र आहे. 


सतेज पाटील म्हणाले, संभाजीराजेंचं स्वागत असेल 


पाटील यांनी काल श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना वाड्यावर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर या ठिकाणी संभाजीराजे यांची सुद्धा भेट झाली. यावेळी बोलताना पाटील यांनी संभाजीराजे यांचे स्वागत असल्याची भूमिका मांडली. ते म्हणाले की, स्वराज्य पक्षाने राज्यात चांगलं वातावरण तयार केलं आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का? हे पहावं लागेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांच्यासोबत ही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. 


आमचा महायुतीचा उमेदवार असणार


त्याचबरोबर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात कोणताही वाद नसल्याचे नमूद केले. आमची लढाई भाजप विरोधी आहे. ही लढाई मुद्द्यांची आहे, कोणतेही मतभेद न करता आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.  दुसरीकडे हसन मुश्रीफ सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी वाड्यावर पोहोचले. यावेळी बोलताना त्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की आमचा महायुतीचा उमेदवार असणार आहे. राजे आणि माझी भेट झालेली नाही. भेट झाल्यास यावरती सविस्तर सांगेन. महाविकास आघाडीचा उमेदवार सतेज पाटील ठरवतील, तर महायुतीचा उमेदवार आम्ही ठरवू, असे त्यांनी यावेळी सांगितले. उमेदवारी निश्चितीसाठी फार वेळ राहिला नसल्याचे म्हणाले. 


काही झालं तरी पक्षाचे नेतेमंडळी एकत्र बसून जागावाटपाचा मार्ग काढतील. जागावाटपावरून कोणतेही भांडण होण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप सर्वे करून उमेदवार निश्चित करणार आहे, चार वर्षात त्यांनी काय केलं याचा सर्वे मला माहित नाही. शिंदे गटाचे दोन्ही खासदार उमेदवार असतील असा दावाही त्यांनी यावेळी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या