Kolhapur News: एबीपी माझाने 'शेतकरी नवरा का नको बाई' कार्यक्रम घेत शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नावरून निर्माण झालेल्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले होते. याच कार्यक्रमातून शिक्षित तरुणींनी शेतकरी स्थळ आल्यास सहानुभूतीने विचार करण्यासाठी साद घातली होती. एबीपी माझाच्या या परिषदेला पहिलं यश पहिलाच कार्यक्रम घेतलेल्या कोल्हापूरमध्ये आलं आहे. फॅशन डिझायनर असलेल्या तरुणीने शेतकरी स्थळ आनंदाने स्वीकारत आदर्श घालून दिला आहे. हा श्रीगणेशा असला, तरी अनेक मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी असा मार्ग निवडल्यास बळीराजाच्या मुलांच्या लग्नाची कोंडी नक्की फुटेल यात शंका नाही.  


फॅशन डिझायनर असलेल्या गायत्री यादवने शेतकरी तरुणाशी विवाह केला आहे. 'शेतकरी हा जगाचा राजा, मी त्याची राणी झाले' ही गायत्रीची प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते. गायत्रीने शेतकरी असलेल्या अनिल कदमशी विवाह करत एबीपी माझाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. एबीपी माझाचा पहिला कार्यक्रम कोल्हापुरात 8 एप्रिल रोजी दत्त शिरोळ कारखान्यात झाला होता. यामध्ये शिक्षित तरुण, तरुणी, शेतकरी तरुण, शेतकरी नेते, वधू वर सूचक मंडळ तसेच लग्नाच्या नावाखाली फसवणूक झालेल्यांना एकाच व्यासपीठावर आणून एबीपी माझाने चर्चा घडवून आणली होती. शेतकरी नवरा का नको या अनुषंगानेच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला होता. 


गायत्री आणि अनिलचा विवाह पार पडल्यानंतर कुटुबीयांनी प्रतिक्रिया दिली. गायत्री पदवीधर असून तिने फॅशन डिझायनरचा डिप्लोमाही प्राप्त केला आहे. गायत्रीने प्रतिक्रिया देताना सांगितले की, गणपतराव पाटील दादा यांनी शेतकरी पती करून घ्यावा, यासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देत मी शेतकरी नवरा करून घेतला आहे. माझे वडिल नोकरदार आहेत त्यांचा विचार करून मी शेतकरी नवरा करून घेतला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सध्या शेतीवर जग चालत असून शेतकरी हा राजा आहे. मी त्या राजाची राणी झाली आहे. 


गायत्रीच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी माझ्या मुलीचा विवाह शेतकरी मुलाशी करून दिला आहे. कारण ते शेतीत राबतात. माझ्या आयुष्यावर अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील आणि गणपतरावदादा यांचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे. त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन लक्षात आला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मुलीचा विवाह शेतकरी मुलाशी करून दिला आहे. गायत्रीने ज्या घरात प्रवेश केला आहे त्या घरातील जाऊबाईंनी सुद्धा तिच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अनिल कदमने सांगितले की, मी शेतकरी असलो, तरी गायत्रीला राजाची राणी करून ठेवेन. 


सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या मुद्यांवर थेट चर्चा व्हावी या उद्देशाने एबीपी माझाने 'मुद्याच बोला' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात केला होता. हा कार्यक्रमातून लोकांच्या प्रश्नांना थेट हात घालण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी मुलांची लग्न होत नसल्याचे प्रकर्षाने समोर आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एबीपी माझाने शेतकरी परिषदेच्या माध्यमातून 'शेतकरी नवरा का नको बाई' शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या