Kolhapur News: कोल्हापूरचे भाग्यविधाते, समतेचा पाया रचणारे, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांना कोल्हापुरात शनिवारी सहा मे रोजी स्मृतिदिनी 100 सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले. शाहू समाधीस्थळावर मानवंदना देण्यासाठी कोल्हापुरातील राजकीय मांदियाळी जमली होती. यावेळी सर्वांच्याच नजरा खासकरून दोन नेत्यांकडे लागून राहिल्या होत्या. माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे आमने-सामने आल्यानंतर बोलणार का? याचीच चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र, जेव्हा उभय नेते आमने-सामने आले तेव्हा त्यांची साधी नजरेला नजरही झाली नाही. 


दोन पाटलांमध्ये बराच काळ गप्पांचा फड


राजाराम कारखान्यापासून महाडिक आणि सतेज पाटील गट यांच्यामध्ये संघर्ष टोकाला गेला आहे. या संघर्षाने टोक गाठले असून त्याचे पडसाद बिंदू चौकापर्यंत उमटले. त्यामुळे हे दोन्ही नेते शाहू समाधीस्थळावर कार्यक्रमाच्या निमित्ताने आमने-सामने आल्यानंतर बोलणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र, दोघांनीही एकमेकांकडे बघणंसुद्धा टाळले. आमदार सतेज पाटील यांचे स्मृतीस्थळावर आगमन झाल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह उपस्थित असलेल्यांशी संवाद साधला. संवाद साधून झाल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या बाजूला जाऊन सतेज पाटील बसले. यानंतर दोन पाटलांमध्ये बराच काळ गप्पांचा फड रंगला. इतर उपस्थितांचे चांगलेच लक्ष या गप्पांच्या फडाकडे लागून राहिले होते. 


राजकीय वजन तेवढे कमी होऊ देऊ नका 


ही चर्चा सुरू असतानाच धनंजय महाडिक यांचे आगमन झाले. त्यांनीही उपस्थितांशी हस्तांदोलन करून आमदार पी. एन. पाटील यांच्या शेजारी जाऊन बसले. मात्र, त्यांनी सतेज पाटील यांच्याकडे पाहिले नाही. खासदार महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्यामध्येही बराच काळ चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असतानाच पी. एन. पाटील यांच्या दिशेने चंद्रकांत पाटील आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पी. एन. पाटील यांना हळूच चिमटा काढला. ते म्हणाले पी. एन. पाटील शारीरिक वजन कमी झालं असलं तरी राजकीय वजन तेवढे कमी होऊ देऊ नका. 


इतर महत्वाच्या बातम्या