कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल (UPSC Result) लागला असून त्यामध्ये राज्यातील 87 उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यामुध्ये कोल्हापूरच्या एका उमेदवाराने जगात भारी असं काम करत यशाचा झेंडा रोवला. फरहान जमादार (Farhan Jamadar) असं त्याचं नाव असून तो 191 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या फरहानचं हे यश इतरांच्या तुलनेत अधिक झळाळून निघणारं आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा (Manoj Kumar Sharma IPS) यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या फरहानने समोर आलेल्या परिस्थितीवर तितक्याच झपाटून मात केली आणि हे यश मिळवलंय. यूपीएससीच्या मुलाखतीमध्येही फरहान जमादारला 'ट्वेल्थ फेल' (12th Fail) या चित्रपटावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फरहानने  दिलेलं उत्तर हे मुलाखत घेणाऱ्यांना अधिक भावलं असेल. 


सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेतील यश हे सर्वोच्च असं समजलं जातं. त्यासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे खर्ची करण्याचं धाडस लाखो तरूण दाखवतात. त्यासाठी कोचिंग क्लासेस लावावे लागतात, पैसा खर्च करावा लागतो. एवढं करूनही यश पदरात पडेल की नाही याची शाश्वती नसते. मनोज कुमार शर्मा यांच्या आयु्ष्यावर 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट आल्यानंतर त्यांची संघर्षयात्रा अनेकांच्या समोर आली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत कोल्हापुरातील सर्वसामान्य कुटुंबातील फरहान जमादार (Farhan Jamadar Kolhapur) यानेही हे यश खेचून आणलंय. 


बिकट परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं 


कोल्हापुरातील कदमवाडी कारंडे मळा या ठिकाणी फरहान जमादारचं कुटुंब राहतंय. घरची परिस्थिती बेताचीच. वडील इरफान जमादार यांचा प्रिटिंगचा व्यवसाय तर आई गृहीणी. कदमवाडीतील सुसंस्कार विद्यालयातून फरहानने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात 12 पर्यंत शिक्षण घेतलं. पुढे सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असतानाच आयएएस व्हायचं निश्चित केलं आणि अभ्यासाला सुरूवात केली. 


अभ्यासात सातत्य आणि IAS पदाला गवसणी


घरची परिस्थिती बेताचीच असल्याने फरहानने कोल्हापुरातच राहुन अभ्यास सुरू केला. त्यासाठी सकाळी 7 वाजता फरहान सायकलने अभ्यासिका गाठायचा आणि रात्री 11 पर्यंत बसायचा. सलग दोन वर्षे अभ्यास केल्यांनतर 2022 साली मुख्य परीक्षेमध्ये अपयश आलं. त्यानंतर फरहान खचला नाही. 


फरहानला यूपीएससीच्या अभ्यासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि तो पुढच्या तयारीसाठी दिल्लीला गेला. यंदाच्या परीक्षेत फरहान देशातून 191 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाची यूपीएससीतून निवड झाल्यानंतर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


मनोज कुमार शर्मा यांच्यावर प्रश्न


मनोज कुमार शर्मा हे कोल्हापूरच्या अधीक्षकपदी असताना त्यांच्या कामाचा बोलबाला झाला होता. सर्वसामान्यांशी संवाद साधणारा लोकांतीलच एक अधिकारी अशी त्यांची ओळख. कोल्हापूरकरांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. मनोज कुमार शर्मा यांच्या संघर्षावर 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट आला होता आणि त्याची चर्चाही झाली. 


फरहान जमादार हा यूपीएससीच्या मुलाखतीसाठी गेला असता त्याला याच चित्रपटाविषयी आणि मनोज कुमार शर्मा यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. फरहान जमादारचं आयएएस व्हायचं ठरलं तेच मनोज कुमार शर्मा यांच्या प्रेरणेमुळे. फरहानला यूपीएससीच्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं, ट्वेल्थ फेल या चित्रपटातून तू काय शिकलास?


मुलाखत घेणाऱ्यांच्या प्रश्नाला फरहान जमादार याने त्यावर तीनच शब्दात उत्तर दिलं. Perseverance, Persistence and Dedication. म्हणजेच सातत्य, चिकाटी आणि समर्पण. 


फरहान जमादारचं अभ्यासातील सातत्य आणि परिस्थितीवर मात करत मिळवलेलं यश हे महत्वाचं आहेच, पण त्यांनी मुलाखतीमध्ये दिलेलं हे उत्तर कदाचित वेगळं ठरणारं आहे. 


ही बातमी वाचा: