convocation ceremony of Shivaji University : विद्यार्थ्यांनी ‘लाईफ लाँग लर्नर’ अर्थात आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत व्यस्त राहावे आणि काळानुरुप आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन कानपूर विद्यापीठाचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या 59 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 


प्रा. संजय धांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात निरंतर शिक्षण, मूल्ये आणि कौशल्ये बाबींवर भर दिला. स्नातकांना विद्यापीठाची पदवी घेऊन आता जीवनाच्या ‘लाईफ लाँग लर्निंग’ या ‘थ्री-एल’ विद्यापीठात प्रविष्ट होत असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले की, जीवनाच्या या विद्यापीठात कोणती परीक्षा नाही की गुण नाहीत, प्रमाणपत्र नाही की लेक्चर्स आणि प्रॅक्टिकलही नाहीत. मात्र, या विद्यापीठातील सर्व विद्यार्थी अनुभवातून शिकत आहेत. आजचे जग हे फार गतीने बदलते आहे. कोविडनंतर तर या बदलांचा वेग अधिकच वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीत, काही कौशल्ये कालबाह्य होत आहेत. तर काही नवी कौशल्ये उदयास येत आहेत. या कौशल्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आज एखाद्याने स्वतःहून नवीन कौशल्य आत्मसात करणे, हेच खरे शिक्षण आहे, जे आजच्या जगात अतिशय आवश्यक बनले आहे.


डिजीटल एकलव्यांची गरज


एकलव्याच्या कथेचे उदाहरण देताना धांडे पुढे म्हणाले, धनुर्विद्येची सर्व कौशल्ये एकलव्याने स्वतः शिकून घेतली आणि आत्मसात केली. त्याने आपल्या हाताच्या अंगठ्याचाही गुरुदक्षिणेपोटी त्याग केला आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा पायांनी धनुर्विद्येचे कौशल्य आत्मसात केले. आजच्या युगात अशा एक नव्हे, तर अनेक एकलव्यांची देशाला गरज आहे. अशा व्यक्तीला तुम्ही ‘डिजीटल एकलव्य’ म्हणू शकता.


ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती, तिची भरभराट करा


राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. ज्ञानाची चोरी होऊ शकत नाही, राजा ते जप्त करू शकत नाही. भावांत त्याची वाटणी होऊ शकत नाही आणि ते सोबत घेऊन जाणे, फारसे जड नाही. ते जितके जास्त खर्च करावे तितकेच ते वाढत जाते आणि त्याची भरभराट होते. ज्ञान हा असा पाया आहे, ज्यावर प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य बांधले जाते. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहावे.


आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे, ज्यातून चारित्र्य घडते, मानसिक विकास होतो, बुद्धीचा विकास होतो आणि माणूस स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, या स्वामी विवेकानंदांच्या विधानाचा दाखला देत राज्यपाल बैस म्हणाले की, शिक्षण हे परिवर्तनाचे उत्प्रेरक असून युवक हा सामाजिक बदलाचा सर्वात शक्तिशाली घटक आहे. सुशिक्षित तरुणांना योग्य दिशा दिल्यास ते इतिहासाच्या वाटचालीत क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतात.


16594 स्नातकांची प्रत्यक्ष पदवी स्वीकृतीसाठी नोंदणी 


दरम्यान, यावर्षी समारंभ केंद्रीय पद्धतीने घेण्यात आला. यंदा 66 हजार 457 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येत आहेत. त्यापैकी 16594 स्नातकांनी प्रत्यक्ष पदवी स्वीकृतीसाठी नोंदणी केली. पदवी वितरित करण्यासाठी परीक्षा विभागाने एकूण 43 स्टॉलच्या माध्यमातून व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांचे पदवी घेण्यासाठी सकाळपासूनच आगमन सुरू झाले. दुपारी गर्दीने परिसर फुलून गेला. सुमारे 15 हजारांवर तरुणाई पदवी घेण्यासाठी आले होते. विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती वर्तुळ उद्यानात छायाचित्रे काढण्यासाठी तितकीच मोठी गर्दी होती.


ऑनलाईन एक हजार जणांची उपस्थिती


दीक्षांत समारंभास सुमारे दीड हजार विद्यार्थी, स्नातक व नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ युट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमाचा देशविदशांतील एक हजार प्रेक्षकांनी लाभ घेतला. जनसंपर्क कक्ष आणि संगणक कक्षाकडून नियोजन करण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या