Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गव्यांचा अक्षरश: धुमाकूळ सुरुच आहे. पन्हाळा तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू होऊन तीन दिवस होत नाहीत तोवर आता आजरा तालुक्यात महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली. गव्याने अचानक समोरून येत दिलेल्या धडकेने उज्वला जानबा यादव (वय 40 रा. घाटकरवाडी ता.आजरा ) या जखमी झाल्या. आज (29 मार्च) ही घटना घडली. उज्वला यादव शेतामध्येऊस भांगलण करत गव्याने समोरून येत हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. वायंगणहोळ-डोंगरवाडी नावाच्या शेतात ही घटना घडली. यानंतर शेजारीच असलेल्या ग्रामस्थांनी केलेल्या आरडाओरड्याने गवा जंगलाच्या दिशेने पळाला. जखमी अवस्थेत उज्वला यांना आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल स्मिता डाके व वनपाल सुरेश गुरव यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. 


पाच दिवसातील तिसरी घटना 


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात गव्याने हल्ला केला होता. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील माजी उपसरपंच असलेल्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. 25 मार्च रोजी शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीपैकी केदारलिंगवाडीमधील गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना  घडली. बंडू बाबू फिरंगे (वय 65 रा. उदगिरीपैकी केदारलिंगवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 


फिरंगे नेहमीप्रमाणे बैलांना पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेले होते. यावेळी मागून आलेल्या गव्याने धडक मारून जखमी केले. धडक मारल्यानंतर बैल उधळले तेव्हा गवा जंगलाच्या दिशेने पळाला व फिरंगे जखमी अवस्थेत पडून राहिले. बैल घरी गेल्यानंतर ते घरी आले नाहीत म्हणून घरचे ओढ्याच्या दिशेने गेल्यानंतर फिरंगे जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांना हाताला, काखेत, डाव्या कुशीत गंभीर जखम झाली आहे. 


पन्हाळा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू 


ही घटना ताजी असतानाच  शेतात वैरण आणण्यासाठी शेताकङे जात आसताना गव्याने हल्ला केल्याने पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला. गावात घुसलेल्या गव्याला हुसकावून लावताना हा प्रकार घडला. दुपारी दोन वाजण्याच्या सूमारास म्हारकी नावाच्या शेतात जणावरांनां वैरण आणण्यासाठी जात असताना गवा मक्क्याच्या शेतात उभा होता. यावेळी गव्याने माणिक पाटील यांच्यावर हल्ला केला.  गव्याच्या हल्ल्यात थेट छातीत शिंग घूसल्याने ते जागीच ठार झाले.


इतर महत्वाच्या बातम्या