Rajaram Sakhar Karkhana : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सतेज पाटील गटातील 29 उमेदवार अपात्र ठरल्यानंतर तगडा झटका बसला आहे. नियमानुसार ऊस कारखान्याला न घातल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांनी जाहीर सत्ताधारी महाडिक गटाला जाहीर आव्हान दिले आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार, त्याठिकाणी न्याय मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. हा काळा दिवस असल्याचे सांगत पहिला बंटी पाटील 12 तास राबत होता पण आजचा निकाल बघता 24 तास राबणार, असल्याचे ते म्हणाले.
सतेज पाटील यांनी उमेदवार अपात्र ठरल्यानंतर महाडिक गटावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, दप्तरच त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे काय गडबड करणार याचा अंदाज येणं शक्य नव्हतं. आमचं शक्ती प्रदर्शन बघितल्यानंतर त्यांचं डोकं चालायला सुरुवात झालं. लोकांमध्ये जाऊन ही निवडणूक जिंकू शकत नाही हे महाडिकांच्या शंभर टक्के लक्षात आल्याने रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. दबावाच्या राजकारणातून हा निर्णय घेण्यात आला.
सहकारातला आजचा काळा दिवस म्हणावा लागेल
ते पुढे म्हणाले की, आमच्या 28 लोकांना जो निकष लावला तोच निकष सगळ्यांना लावला का? राज्याच्या सहकारातील आजचा काळा दिवस म्हणावा लागेल. आमचे सगळ्या गटामध्ये अर्ज शिल्लक आहेत, त्यांचा एकही उमेदवार बिनविरोध होत नाही. 25 वर्षाचा कारभार चोख नाही म्हणून डाव्या बाजूला न बोलता बसले होते. ही निवडणूक राजारामची आहे की डी वाय पाटील कारखान्याची आहे?
आता 24 तास काम करणार
त्यांनी पुढे सांगितले की, एकदा हातात गोष्ट घेतली की थांबायचं नाही, तुम्ही काळजी करू नका. महाडिक किती घाबरले आहेत हे कोल्हापुरातील लोकांना जाऊन सांगूया. रडीचा डाव करून लोकांना बाजूला करण्याचा डाव घातला. लांग घातली होती तर कुस्ती खेळायचे होती एवढी खुमखुमी होती. एवढी ताकत होती तर उद्याच्या उद्या मैदानात या. माझे 21 उमेदवार तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत. कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखे लढा बावड्याचा पाटील कधी मागं पडणार नाही. तुम्ही चांगलं केलं रडीचा डाव खेळला. मी 14 तास काम करणार होतो आता 24 तास काम करणार. आता पाठ सोडणार नाही, पत्ता त्यांनी टाकला असला तरी डाव मात्र आम्ही जिंकणार आहे. पत्ता कोणताही असूदे तिकडे जोकर आहे. ही लढाई महाडिक विरुद्ध बंटी पाटील नाही तर 12,000 सभासदांची आहे. उमेदवार कोण आहे याचा विचार करू नका पायाला पान बांधून कामाला लागा. या निवडणुकीत आता दोन पावलं नाही तर दहा पावलं पुढे टाकायचे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या