Kolhapur Water Issue : कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आघाडी सरकारच्या काळात थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. मात्र तब्बल एक तपानंतर कोल्हापूर शहराच्या हद्दीत थेट पाईपलाईनचे पाणी पडलं. मात्र अद्यापही शहराला या योजनेचा पूर्ण फायदा होत नाही. आजही पाण्यासाठी टँकरचा वापर करावा लागतो.
देशातील सर्वात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे पाहिलं जातं. महापुराचा फटका तर कोल्हापूर शहराच्या पाचवीला पुजला आहे. ऊसामुळं ऐन उन्हाळ्यात देखील हा जिल्हा हिरवागार फुललेला दिसतो. याच जिल्ह्यातील कोल्हापूर शहराला मात्र पाण्याच्या समस्येने ग्रासलं आहे.
काळम्मावाडी धरणामधून कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आणली. मात्र या योजनेचा अद्याप म्हणावा तितका फायदा कोल्हापूर शहराला होत नाही. 2010 ते 2015 या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ही योजना मंजूर झाली. मात्र प्रत्यक्षात पाणी कोल्हापूर शहरापर्यंत येण्यासाठी 2023 काळ उजाडला. मात्र त्यानंतर देखील शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.
काळम्मावाडी धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले. त्या ठिकाणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनच्या पाण्यात आंघोळ केली. त्यानंतर काही दिवसातच हे पाणी संपूर्ण शहराला मिळेल असं सांगितलं होतं. मात्र वितरणाचे योग्य नियोजन न झाल्याने अद्याप अनेक भागात हे पाणी पोहोचले नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने देखील पाण्याच्या वितरणाबाबतचे टेस्टिंग चालू असल्याचे कबुल केले. त्यामुळे कुठे कमी दाबाने तर कुठे जास्त दाबाने पाणीपुरवठा होतो. ज्या ठिकाणी पाण्याचा दाब जास्त होतो त्या ठिकाणी लीकेज होतं आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा खंडित केला जातो.
कोल्हापूर शहराच्या चहुबाजूने नद्या आहेत, पाणी मुबलक आहे. मात्र केवळ ढिसाळ नियोजनामुळे कोल्हापुरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. कोल्हापूर शहरात पाण्याची टंचाई आहे हे राज्यातील कुणाला विचारलं तर ते खरं वाटणार नाही. मात्र हे सत्य आहे. त्यावर कधी उपाय काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ही बातमी वाचा: