कोल्हापूर : कोल्हापुरात शिवाजी पेठेतील विमला गोयंका शाळेत बारावीच्या परीक्षा प्रवेश पत्रिकेवरून शनिवारी अभूतपूर्व गोंधळ झाला होता. प्रवेश पत्रिकेवर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थ्यांसह पालक संतप्त झाले होते. नंतर या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रिकेवरील विषय बदलून देण्यात आले. मात्र, या शाळेवर कारवाई केली जाणार असल्याचं बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं आहे.
अनागोंदी कारभार उघडकीस आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही रडू कोसळले
बारावीच्या लेखी परीक्षेच्या तोंडावर दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 120 विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटच चुकीचे आल्याने विद्यार्थ्यांसह पालक संतप्त झाले होते. काही विद्यार्थ्यांना हॉल तिकिट सुद्धा मिळालं नव्हतं. दुसरे विषय हॉल तिकीटावर आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी संस्थेचे सचिव, प्राचार्यांना धारेवर धरले होते. विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभादिवसी हा अनागोंदी कारभार उघडकीस आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही रडू कोसळले होते.
बारावीची परीक्षा उद्यापासून सुरु
बारावीची परीक्षा उद्यापासून सुरु होत आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांना आधीच हॉलतिकिट देण्यात आली आहेत. मात्र, विमला गोयंका हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने शनिवारी हॉलतिकिटाचे वाटप केले. बारावीच्या वर्गात 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना 100 गुणांचे इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे चार तर 200 गुणांचा कॉम्प्युटर सायन्स विषय शिकवला जात आहे. परंतू, परीक्षेच्या हॉलतिकीटवर मात्र कॉम्प्युटर सायन्सऐवजी भूगोल, मराठी असे विषय आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता.
तर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार
दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली आहेत. तर 37 ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. या पैकी 7 लाख 68 हजार 967 विद्यार्थी विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. 3 लाख 80 हजार 410 विद्यार्थी कला शाखेची तर 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षार्थींना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटे वाढवून दिले जाणार आहेत. या आधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते, परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर देखील पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या