Kolhapur Police : सोन्यासारखा कष्टाच्या पैशाने घेतलेला मोबाईल हरवल्यानंतर किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरी झाल्यानंतर आपण सामान्यत: आशा सोडून दिलेली असते. तरीही औपचारिकता म्हणून तक्रार नोंदवण्यासाठी जात असतो. मात्र, अशाच दाखल झालेल्या तक्रारींचा छडा लावून तब्बल 250 मोबाईल शोधण्याची किमया कोल्हापूर पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यानं केली आहे. तब्बल 250 मोबाईल नागरिकांना सुखरुपपणे परत दिल्याने त्यांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. 


30 लाख रुपये किंमतीचे 250 मोबाईल संच शोधून काढले 


कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत मोबाईल संच हरवल्यानंतर तक्रारी दाखल आहेत. सदर दाखल झालेल्या तक्रारीमधील मोबाईलचे IMEI एकत्रित करून सायबर पोलीस ठाणेमार्फत संबंधित मोबाईल कंपनीशी संपर्क साधून आणि CEIR पोर्टलचा वापर करून हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी सायबर पोलीस ठाण्यांना सूचना केल्या होत्या. तसेच पथकेही नेमण्यात आली होती. 


जास्तीत जास्त मोबाईल नागरिकांना परत करण्यासाठी सूचना


मोबाईल व कागदपत्रांची ओळख पटवून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  मा. सुनील फुलारींच्या हस्ते मोबाईल संबंधिक नागरिकांना मोबाईल देण्यात आले. यावेळी सुनील फुलारी यांनी तपास पथकाचे अभिनंदन करून भविष्यात देखील सायबर पोलीस ठाणेच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल नागरिकांना परत करण्याबाबत सूचना दिल्या.


नागरीकांना त्यांच्या हरवलेला मोबाईल मिळण्याची अपेक्षा नसतानाही मिळाल्याने समाधान व्यक्त केले. मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. नियुक्त केलेल्या पथकांनी मागील एक महिन्यांमध्ये तांत्रिक तपास करून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अंदाजे 30 लाख रुपये किंमतीचे 250 मोबाईल संच शोधून काढले. 


या पथकाने शोधून काढले मोबाईल


ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे सुचनेनुसार मा. अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सायबर पोलीस ठाणेकडील पो.उप निरीक्षक मनोज पाटील, पोउपनि अतिष म्हेत्रे पोलीस अंमलदार महादेव गुरव, सागर माळवे, अमर वासुदेव, रविंद्र पाटील, प्रदीप पावरा, सचिन बेंडखळे, अजय सावंत, विनायक बाबर, सुरेश राठोड, दिलीप पोवार, रविंद्र गाडेकर, विशाल पाटील, सुहास पाटील, विक्रम पाटील, संगिता खोत, रेणुका जाधव यांची वेगवेगळी पथके तयार करून गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी नेमण्यात आली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या