कोल्हापूर/सोलापूर : कोल्हापूर ते सोलापूर फक्त वाद आणि वादच ओढवून घेतलेल्या आणि वाद निर्माण केलेला तत्कालिन सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहारला (Kiran Lohar) 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात अडकल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. शिक्षणाधिकारी किरण लोहार तसेच अन्य एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. बेहिशेबी कोट्यवधींची संपत्ती समोर आल्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाने किरण लोहारसह तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे या दोन अधिकाऱ्यांविरोधातही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. लाचखोरीत अडकलेला किरण लोहार ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्यावर आरोप केल्यांतर सर्वाधिक चर्चेत आला होता. 


किरण लोहार लाचखोरी करून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासत असताना त्याला परावृत्त करण्याऐवजी त्याला तोलामोलाची साथ देण्याचे काम त्याची बायको आणि मुलाकडूनही करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


किरण लोहारच्या कोल्हापुरातील घराची झाडाझडती 


दरम्यान, किरण लोहारच्या कोल्हापुरातील पाचगाव येथील घराची झाडाझडती घेण्यात आली. काल बुधरावारी उशिरापर्यंत त्याच्या घरात झाडाझडती सुरू होती. त्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली त्याचबरोबर अन्य मालमत्तांवरही जप्तीची कारवाई होणार असल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपधीक्षक सरदार नाळे यांनी दिली आहे. 


दरम्यान, किरण लोहारच्या घराच्या घेतलेल्या झडतीत चार कार मिळून आल्या. यामध्ये दोन कार किरण लोहारच्या नावावर आहेत, तर दोन कार अन्य नातेवाईकांच्या नावावर आहेत. मुंबईमधील प्लॉट, पुण्यातील फ्लॅट याचीही कागदपत्रे मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. लोहारने काही नातेवाईकांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती नाळे यांनी दिली. 


5 कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपयांची अपसंपदा जमविली 


दरम्यान, किरण लोहारच्या चौकशीत समोर आलेल्या आकडेवारीने डोळे विस्फारले आहेत. किरण लोहारने भ्रष्ट व गैरमार्गाने अपसंपदा जमवली आहे. किरण लोहारसह पत्नी, मुलग्यावर सोलापुरातील सदर बझार पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण लोहारने परिक्षण कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक 5 कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपयांची अपसंपदा जमविली आहे. पत्नी व मुलगा निखिलने भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास मदत केली आहे. 


दरम्यान, किरण लोहारने स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ते स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतलं होतं. याच किरण लोहारने डिसले गुरुजींवर आरोप केले होते.


किरण लोहार कोल्हापूरमध्येही अत्यंत वादग्रस्त कारकिर्द 


किरण लोहार लाचखोरीच्या जाळ्यात सापडण्यापूर्वी 13 महिने अगोदर  सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत काम केलं आहे. तथापि, कोल्हापूर जिल्हा परिषदेतही त्याच्या कामाची शैली अत्यंत वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहारवर पैसे घेतल्याचे आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला होता. त्यामुळे लोहारला कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला होता. सप्टेंबर 2018 मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने कारवाई करत माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. 


पीएच.डी आणि विद्यापीठाची सुद्धा चांगलीच चर्चा


किरण लोहार जिल्हा परिषदेतील कामाच्या पद्धतीवरून जितके वादग्रस्त ठरला, त्याच पद्धतीने त्याची पीएच.डी सुद्धा चांगलीच चर्चेत आली होती. त्याला एका खासगी विद्यापीठाने पीएच.डी दिल्यानंतर त्यांनी एकप्रकारे सूचनावजा फर्मान काढताना गावभर फलक लावण्यासाठी सांगितले होते. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली होती, पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाले होते. टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतंही विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या