Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यामधील बहिरेश्वरमध्ये वयोवृद्ध शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. नामदेव सणगर (वय 65) या शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहिरीत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली की घातपात याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.
पुतण्याला विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला
मयत नामदेव सणगर हे घरी शेताला पाणी पाजून येतो असे सांगून शनिवारी रात्री घरातून बाहेर पडले होते. त्यांचे पुतणे नागेश सणगर सुद्धा शेतीला पाणी पाजण्यासाठी रात्री शेतावर पोहोचले. यानंतर त्यांनी विहिरीवरील मोटर सुरु करण्यासाठी गेल्यानंतर त्यांचे चुलते नामदेव सणगर विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यांनी तत्काळ नामदेव यांचा मुलगा मनोहर सणगरला या घटनेची माहिती दिली. गावच्या पोलिस पाटलांनी करवीर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांचे दोन्ही पाय व डावा हात साडीच्या सहाय्याने बांधण्यात आला होता.
पोलिसांनी श्नानपथकाला पाचारण केले होते, पण ते त्यांच्या घरापर्यंत जाऊन घुटमळले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यामुळे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होणार आहे.
मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू
दरम्यान, मामाच्या गावी उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या अवघ्या 13 वर्षीय आदित्य शिवाजी पाटील या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील वेतवडेमध्ये घडली. तो पोहण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. आदित्य मूळचा गगनबावडा तालुक्यातील खेरीवडे असला, तरी तो सध्या पुण्यात राहत होता.
आदित्य वेतवडेमध्ये मामाकडे उन्हाळी सुट्टीसाठी महिनाभर राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास वेतवडे येथील धामणी नदीत आंघोळीसाठी गेला होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तसेच पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने सर्वत्र त्याची शोधाशोध सुरू करण्यात आली. जनावरांना पाण्यासाठी घेऊन गेलेल्या एका व्यक्तीला नदीकाठी चप्पल व कपडे दिसल्याने तो या ठिकाणीच बुडाला असणार याचा अंदाज घेऊन गावातील तरुणांनी पाण्यात शोध सुरु केला. अखेर सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.
इतर महत्वाच्या बातम्या