Kolhapur BJP Office: कोल्हापुरातील (Kolhapur News) भारतीय जनता पक्षाचे नूतन कार्यालय हे लोकसेवेचे केंद्र बनेल असा विश्वास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातील नागाळा पार्कातील भाजपच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजपचे नवीन ऑफिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे राज्यातील पहिले कार्यालय आहे.
राज्यातील भाजप कार्यकर्त्यांसाठी हे पहिले समर्पित कार्यालय आहे. संपूर्ण राज्यातून बैठकीसाठी कोल्हापुरात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी कॉन्फरन्स हॉल, अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी विशेष दालन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा सायबर विभाग, ग्रंथालय अशा विविध विभागांनी सुसज्ज करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेला अंत्योदयचा मंत्र घेऊन, भाजप कार्यकर्ते अहोरात्र सेवाकार्य करत असतात. त्यामुळे आगामी काळात हे कार्यालय लोकसवेचे प्रमुख केंद्र ठरेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून भाजपचे प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असे कार्यालय असावे, असा आग्रह धरला होता. त्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे कार्यालय उभारण्यात आले आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, सरचिटणीस नाथाजी पाटील, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, हेमंत अराध्ये, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, अजित ठाणेकर, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, किरण नकाते, सुहास लटोरे, माणिक पाटील चुयेकर, सुजीत चव्हाण, अजिंक्य चव्हाण, जयराज निंबाळकर, हर्षद कुंभोजकर, अमोल पालोजी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाचा वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित
मंत्री चंद्रकांत पाटील हे आपला वाढदिवस दरवर्षी लोकसेवेसाठी समर्पित करत असतात. त्यासाठी कार्यकर्त्यांनी हार, फुले आणि बुके नको, जनसेवेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करतात. यंदा त्यांनी आपल्या 10 जून रोजीच्या वाढदिवस आरोग्यासाठी समर्पित केला आहे. प्रदीर्घ आजारांवर मात करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाची होणारी ओढाताण टाळण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या