Kolhapur Crime: आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालेल्या आईचा लेकासमोरच भीषण अपघातात जागीच दुर्दैवी अंत झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये घडली. हा अपघात कागल-निढोरी मार्गावर वाघजाई घाटात घडला. मोपेड व कारची समोरासमोर धडक होऊन संगीता सुनिल कुंभार (वय 40, रा. बोरगाव, ता. निपाणी, जि. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात मुलगा शुभम सुनील कुंभार (वय 20) हा जखमी झाला आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली आहे.
मोपेडवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
संगीता कुंभार मुलगा शुभमसोबत मोपेडवरून देवदर्शन करण्यासाठी आदमापूरकडे जात असताना याचवेळी कागलकडे कार जात होती. वेगात असलेल्या मुलगा शुभमचे मोपेडवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या कारवर डाव्या बाजूला जाऊन मोपेड धडकली. या धडकेत संगीता मोपेडवरून रस्त्यावर जोरात आदळल्या. यामुळे डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
डोजरला मागून धडक दिली, भीषण अपघातात तिशीतील दोन तरुणांचा मृत्यू
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर हद्दीत किणी टोल नाका आणि घुणकी फाट्यादरम्यान शनिवारी (27 मे) इर्टिगा कारने (एमएच-48एके- 6545) डोजरला मागून धडक दिली. या भीषण अपघातात तिशीतील दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. इर्टिगामध्ये सहा तरुण होते. ते मुंबईत प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. प्रदर्शन पाहिल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांनी कोल्हापूरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. शनिवारी पहाटे गावापासून हाकेच्या अंतरावर आले असताना इर्टिगाने मागून डोजरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीने दिशा बदलून पुन्हा पुण्याच्या दिशेने तोंड केले.
या अपघातात इर्टिगा कारमधील इतर चार जण गंभीर जखमी झाले. टोप, शिये व मिणचे येथील तरुण प्रदर्शन बघण्यासाठी मुंबईला गेले होते. राहुल अशोक शिखरे (वय 30, रा. मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय 28, रा. टोप) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. सुनील कुरणे (वय 24), वैभव चौगुले (वय 23, सर्व टोप) तर अनिकेत जाधव (वय 22), निखिल शिखरे (वय 27, रा. मिणचे) जखमी आहेत. अपघातग्रस्त सर्व तरुण 20 ते 30 वयोगटातील आहेत. व्यवसायासाठी मुंबईकडे केलेली ट्रीप नियतीच्या धक्क्याने त्यांच्यासाठी वेदनादायी ठरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या