Kolhapur News : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेत एकाला वाचवण्यात यश आले. राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत (Panchganga River) पोहोण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार घडला. पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांपैकी लाईन बाजारमधील माहीर इम्रान पठाण (वय 10, रा. लाईन बाजार, कोल्हापूर) बुडाला. त्याच्यासोबत असलेला आंबेडकरनगर कसबा बावडा येथील मानव गणेश कांबळे याला वाचण्यात यश आलं आहे. नाकातोंडात पाणी गेल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार ही दोन शाळकरी दुपारी साडे बाराच्या सुमारास पंचांग नदी पात्रात पोहोण्यासाठी गेली होती. माहीर आणि मानव या दोघांनाही यादव राजाराम बंधाऱ्याजवळ नदीत उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागल्यानंतर दोघांनीही आरडाओरडा सुरु केला. मुलांचा आरडाओरडा एकूण मासे पकडत असणाऱ्या तरुणाने नदीपात्रात उडी घेत मानव गणेश कांबळे (रा. आंबेडकर नगर, कसबा बावडा) याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तात्काळ उपचारासाठी सीपीआय रुग्णालय दाखल करण्यात आले. 


यावेळी अग्नीशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान गाडीसह तात्काळ दाखल झाले. दरम्यान, बावडा बचाव पथकाचे जवानही दाखल झाले. बोटही मागवण्यात आली होती. बुडालेल्या माहीर इम्रान पठाण याचा अग्निशमन दलाच्या जवानांबरोबर बावडा रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोध घेतला. दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर सीपीआरमध्ये उत्तरीय तपासण्यासाठी पाठवण्यात आला. 


शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत


दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमध्ये 12 दिवसांपूर्वी शेततळ्यात सख्ख्या दोन चिमुरड्या भावडांचा बुडून दुर्दैवी अंत झाला होता. अयाज युनूस सनदी (वय 10) आणि आफान युनूस सनदी (वय 7) असे दुर्दैवी अंत झालेल्या बालकांची नावे आहेत. जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडीत सख्खे भाऊ शिकत होते. शाळा सुटल्यावर घरी निघाले असताना गावातील नागरगोजे वस्तीवरील तलावाशेजारुन जाताना लहान भावाचा पाय घसरला आणि तो पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने पाण्यात उडी घेतली. यावेळी लहान भावाने मोठ्या भावाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. बुडालेल्या दोघा मुलांना बाहेर काढून तात्काळ सरपंच उमेश पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, या दोन्ही मुलांचा उपचारापूर्वीच अंत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


इतर महत्वाच्या बातम्या