Kolhapur Weather update: कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापासून मान्सून सक्रिय झाला असला, तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने बळीराजासह सर्वांच्याच नजरा ढगाळ आभाळाकडे आहेत. मात्र पुढील पाच दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जोर पकडणार आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासह घाट माथ्यावर 1 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोल्हापुरात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
दुसरीकडे, 2 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, कोकणसह कोल्हापूर जिल्ह्यात 3 आणि 4 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातही 3 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्याला मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील पाच दिवसांसाठी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शेती अडचणीत
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यात पावसाने दमदार सलामी दिली आहे. मात्र, उर्वरित जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुसऱ्या बाजूला वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात घट येण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे शेतकरी निसर्गाच्या चक्रव्युहात अडकला आहे. कृषी विभागाने यंदाच मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणांचे अनुदानावर वितरण केले आहे. त्यात याचवर्षी पाऊस लांबल्याने कृषी विभागाच्या सोयाबीनची मूल्य साखळी वाढवण्याच्या प्रयत्नांना (उत्पादन वाढीसाठी) ब्रेक लागण्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.
खरीप हंगामात वेळेत पेरण्या न झाल्याने त्याचा थेट परिणाम भात आणि सोयाबीनवर होणार असून उत्पादन घटण्याचा धोका आहे. ऊसावरही विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यात मान्सूनने केलेल्या विलंबामुळे रोहिणी नक्षत्र आणि मृग नक्षत्रात कोणत्याही प्रकारची पेरणी होऊ शकली नाही. सर्वसाधारणपणे खरीप हंगामात 30 जूनपर्यंत पेरण्या केल्या जातात. मात्र, जून महिना आज संपणार असल्या, तरी जिल्ह्यातील पेरणी पूर्ण झालेली नाही.
शेती अडचणीत असतानाच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला असून त्यामुळे पावसाने आणखी दडी मारल्यास मुबलक पाणीसाठा होण्यावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या