Kolhapur Crime: विवाहासाठी मुलगी दाखवण्याचे सोडून सरबताचे कारण सांगत घरी जाऊन मुलाच्या वडिलांच्या घरी वधूवर सूचकाने दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर शहरात (Kolhapur News) उघडकीस आली. स्थानिक गुन्हे शाखेनं घरफोडीचा उलघडा केला आहे. वधूवर सुचक केंद्रचालक रोहन रविंद्र चव्हाण (वय 25, रा. फुलेवाडी, ता. करवीर) याला बेड्या ठोकल्या आहेत. चोरीतील दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. रविंद्रकडून सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकुण 5 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घरफोडी येथील फुलेवाडी रिंगरोडवरील अयोध्या कॉलनीत झाली होती.


फिर्यादी विपुल सुर्यकांत चौगुले यांच्या घरातून चोरट्याने तिजोरीतील 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेनं गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या माध्यमातून चोरट्याला गजाआड केले. 


सापळा रचून केली कारवाई 


संशयित रविंद्र फुलेवाडी ते रंकाळा टॉवर मार्गाने चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. त्याला ताब्यात अंगझडती केली असता घरफोडीतील 4 लाख 93 हजारांचे दागिने सापडले. त्याच्याकडून ते हस्तगत करण्यात आले. संशयित रोहनने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली. एकूण 5 लाख 43 हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. 


दिशाभूल करून घरात डल्ला मारला 


बेड्या ठोकलेल्या रोहनचे वधुवर सुचक केंद्र आहे. विपुल चौगुले मुलगीच्या शोधात असल्याने वधुवर सुचक केंद्रचालक रोहनच्या घरी गेले होते. रोहनने विपुल घरी नसताना त्याच्या पालकांना मुलगी दाखवण्यासाठी स्वतःच्या कार्यालयात बोलावून घेतले होते. यावेळी कार्यालयात आलेल्यांसाठी सरबत आणण्यासाठी विपुलच्या वडिलांकडून रोहनने त्यांच्या सायकलची चावी मागून घेतली. यावेळी त्याने दिशाभूल करत घराची सुद्धा चावी काढून घेतली. यानंतर त्याने फिर्यादी विपुलचे घरी जाऊन तिजोरीतील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.


ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार रणजित कांबळे, प्रीतम मिठारी, प्रशांत कांबळे, सागर चौगले, संदिप गायकवाड, राजेंद्र वरंडेकर, सचिन बेंडखळे, विक्रम पाटील, सुप्रिया कात्रट यांच्या पथकाने केली. 


इतर महत्वाच्या बातम्या