Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्यांची भयावह मालिका सुरुच आहे. आता हातकणंगले तालुक्यात दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे तात्यासाहेब कोरे वारणा मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघा मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. 


हातकणंगले तालुक्यातील पारगावमध्ये बिरदेव नगर वसाहतीमध्ये राहणारे विनायक पाटील व त्याचा मित्र बाबासाहेब मोरे यांनी एकाच झाडाला आत्महत्या केली. विनायक व बाबासाहेब मोरे जिवलग मित्र होते. मिळालेल्या माहितीनुसार विनायक पाटील यांचा चिरा ओढण्याचा व्यवसाय होता. दोघेही गाडीवरून कोकणात जाऊन चिरा आणून त्याची विक्री करत होते. विनायक यांच्या पश्चात आई, पत्नी मुलगा व मुलगी आहे. बाबासो मोरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. दोघांच्या पार्थिवाचे पारगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने नैराश्यातून दोघांकडून टोकाचे पाऊल


मित्र बाबासो मोरे हा विनायक यांना सहकार्य करत होता. बाबासाहेब मोरे यांचा शेतीसह जनावरांचा गोठा आहे. दोघांनाही मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर असल्याने तणावात होते. आर्थिक चणचण आणि कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने नैराश्यातून आज (3 एप्रिल) दुपारी एकच्या सुमारास पारगाव येथील वारणा तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरामध्ये एका झाडाला दोघांनीही दुचाकीचा आधार घेत सोबत आणलेल्या दोरीने झाडाच्या एकाच फांदीला एकाचवेळी आत्महत्या करत जीवन संपवले. 


माजी सरपंच पत्नीने पतीच्या वाढदिवसाला केली आत्महत्या


दरम्यान, माजी सरपंच पतीच्या वाढदिनीच माजी सरपंच पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वीच जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडली होती. सुप्रिया बाजीराव वाडकर (वय 33. रा. हणबरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. सुप्रिया यांचे वडिल दिलीप पाटील यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती बाजीराव वाडकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वडील दिलीप पाटील यांनी मुलगी सुप्रियाला माहेरकडून पैसे आणण्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयातून शारिरीक आणि मानसिक त्रास देऊन तसेच शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती बाजीरावने 2012 पासून सुप्रिया यांना माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी सातत्याने चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून हणबरवाडीमधील राहत्या घरी गळ्याला गळफास घेत आत्महत्या केली. 


इतर महत्वाच्या बातम्या