Kolhapur News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापुरातील बाळूमामा मंदिराचे (Balumama) विश्वस्त आणि आदमापूरचे सरपंच यांच्यात भररस्त्यात हाणामारी झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. ट्रस्टीच्या नेमणुकीवरुन वादाची ठिणगी पडली आहे. रिक्त झालेल्या जागांवर गावाला विचारात न घेता ट्रस्टींची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी केला आहे. या संदर्भाने ते आज कोल्हापुरात वकिलांची भेट घेण्यासाठी आले असतानाच ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले समर्थकांनी हल्ला केला. भररस्त्यात हा सगळा प्रकार घडला. 


मानद अध्यक्ष धैर्यशील भोसलेंच्या समर्थकांकडून हल्ला


ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरु असलेल्या गैरकारभाराविरोधात सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात त्यांच्या वकिलांना भेटण्यासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, या प्रकारानंतर सरपंच विजय गुरव यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मूळ 11 ते 12 ट्रस्टींना  बोलवून बैठक व्हायला हवी होती, पण गावातील मोजक्या लोकांना ट्रस्टी करुन घेतलं आहे. गावातील लोकांना ट्रस्टी म्हणून घेण्यास विरोध नाही, पण नावे निवडताना गावातील सर्व लोकांना विचारात घेऊन गावसभेत निर्णय व्हायला हवा होता. दुसरीकडे, गावाबाहेरील लोक आणून एकहाती कारभार करायचा असा यांचा प्रकार चालला आहे, त्यामुळे सरपंचांसह आम्ही लढा देत आहोत, 95 टक्के गाव एकत्र असल्याची प्रतिक्रिया सरपंचासोबत आलेल्या सहकाऱ्याने दिली. 


ट्रस्टी नेमणूक तसेच कार्याध्यक्ष नेमणूक यावरुन दोन गट पडले आहेत. श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्टची स्थापना 2003 मध्ये झाली आहे. ट्रस्टमध्ये 18 ट्रस्टी असून 6 ट्रस्टींचे निधन झाले आहे. गेल्या महिन्यात कार्याध्यक्ष राजाराम मगदूम यांचे निधन झाले. त्यामुळे सध्या ट्रस्टवर एकूण 12 ट्रस्टी राहिले आहेत.


देवस्थानची कागदपत्रे मिळावीत


दुसरीकडे, बाळूमामा देवस्थानची कागदपत्रे मिळावीत, यासाठी समितीचे विश्वस्त सचिव रावसाहेब कोणेकरी यांनी भुदरगड पोलिसांत धाव घेतली आहे. देवस्थान समितीचे सचिव रावसाहेब कोणेकरी यांनी देवस्थानचे प्रोसेडिंग, मासिक सभा इतिवृत्त, इतर कागदपत्रे सचिव या नात्याने आपल्या ताब्यात मिळावीत, यासाठी भुदरगड पोलिसांत अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर समितीच्या 12 पैकी 8 विश्वस्त सदस्यांनी सह्या केल्या आहेत. 


VIDEO : Kolhapur : कोल्हापूरच्या बाळुमामा देवस्थानच्या ट्रस्टी आणि सरपंचांची हाणामारी


इतर महत्वाच्या बातम्या