Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याबद्दल एका महिलेसह तिघांविरोधात गडहिंग्लजमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोनू कांबळे असे या महिलेचं नाव आहे. तिच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. पीडिताने दिलेल्या जबाबानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता सोनूच्या परिचयातील आहे. याचाच फायदा घेत सोनू व दोन अनोळखी इसमांनी पीडिताला 9 डिसेंबर रोजी पळवून नेल्यानंतर गुंगीचे औषध देत तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. कोणाला सांगिल्यास वडीलांना व भावाला ठार मारण्याची धमकी सुद्धा सोनूने पीडिताला दिली. या घटनेचा नेसरी पोलिसांत गुन्हा  दाखल झाला होता. पीडिताने बालगृहाच्या समुपदेशक व तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबाच्या आधारे गडहिंग्लज पोलिसांनी सोनूसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 


दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग


दरम्यान, कोल्हापुरातही दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंगाचा केल्याच्या घटना तीन दिवसात समोर आल्या आहेत. मोबाईल चार्जर देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.  शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रकाश कलगुटगे (वय 24) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अन्य एका घटनेत अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी फोनवरून त्रास दिल्याबद्दल तसेच तिचा पाठलाग केल्याप्रकरणी सुशांत भास्कर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. 


जबरदस्तीने प्रेमसंबंधांसाठी प्रयत्न, तरुणाकडून तरुणीवर कोयत्याने वार


दरम्यान, इचलकरंजीमध्ये प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणाने तरुणीवर थेट कोयत्याने हल्ल्याने गंभीर जखमी झाली आहे. हल्ला करून हल्लेखोर पसार झाला आहे. तरुणाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणीच्या हाताची बोटे तुटली आहेत. तरुणीच्या हात, मान व डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. हल्लेखोर तरुणाचा अन्य एका मुलीशी वर्षभरापूर्वी विवाह होऊनही त्याने जबरदस्तीने प्रेमसंबंधासाठी तगादा लावला होता. तरुणीने त्याचे लग्न झाल्याने संबंध तोडले होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होता. संबंधित तरुणीने त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. तरीही जबरदस्तीने संबंधांसाठी प्रयत्न करत होता. 


इतर महत्वाच्या बातम्या