Kolhapur Crime : सांगली रिलायन्स ज्वेलर्सवर पडलेल्या भरदिवसा दरोड्याने थरकाप उडाला असतानाच तशाच पद्धतीचा कोल्हापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या करवीर तालुक्यातील बालिंग्यामधील कात्यायणी ज्वेलर्स या सराफ पेढीवर सशस्त्र दरोडा पडला. चार सशस्त्र दरोडेखोरांनी काल (8 जून) भरदिवसा गोळीबार करत कात्यायनी ज्वेलर्समधील पावणेदोन कोटींचे दागिने लुटून नेले. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात आणि मारहाणीत दोघे जखमी झाले असून दुकान मालकाची प्रकृती गंभीर आहे. ज्लेलर्समधील फिल्मीस्टाईल दरोडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कोल्हापूर पोलिसांकडून दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर जातानाही हवेत गोळीबार करत कळे गगनबावड्याच्या दिशेने पलायन केले. 


दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत कात्यायणी ज्वेलर्सचे मालक रमेश शंकरजी माळी (वय 40 वर्षे) आणि जितू मोड्याजी माळी (वय 30 वर्षे, दोघे रा. बालिंगा) हे जखमी झाले आहेत. जितू यांच्यावर गोळीबार झाल्याने जखमी आहेत. रमेश माळी यांच्या डोक्यात बेसबॉल स्टिकने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोरांकडे आधुनिक बंदूक असल्याने दुकान आणि बाहेर येऊन तब्बल 15 राऊंड फायर केले. तसेच त्यांनी येताना मॅग्झिनही आणले होते. ते बदलताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. 


पावणे दोन कोटींचा मुद्देमाल लुटला


भरदुपारी टाकलेल्या दरोड्यात कात्यायनी ज्वेलर्समधील तीन किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख असा सुमारे एक कोटी 82 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास हा सशस्त्र दरोडा पडला. मिळालेल्या माहितीनुसार रमेश माळी यांचे बालिंगा मेन रोडवर मुख्य बसस्टॉपजवळ कात्यायनी ज्वेलर्स आहे. दुपारी दीडच्या सुमारास दोन दुचाकीवरुन कोल्हापूर दिशेने आलेल्या चौघांपैकी दोघांनी ज्वेलर्समध्ये प्रवेश केला, तर दोघे बाहेर होते. ज्वेलर्समध्ये प्रवेश करुन बंदुकीचा धाक दाखवून दागिन्यांची मागणी केली. यानंतर काऊंटवर गोळीबारही करण्यात आला. यावेळी जितू दुकानातील बेसबॉल स्टिक घेऊन दरोडेखोरांच्या अंगावर गेल्यानंतर त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आणि त्याच स्टिकने रमेश यांच्या डोक्यात प्रहार करण्यात आल्याने ते खाली कोसळले.  


गोळीबार झाल्याने ग्रामस्थ जमू लागल्यानंतर दरोडेखोरांनी सोन्याची लूट करुन दुकानाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा गोळीबार करत पलायन केले. ग्रामस्थांनी त्यांच्यावर दगडफेक केल्यानंतर दरोडेखोरांनी ग्रामस्थांच्या दिशेने सुद्धा दुचाकीवरुन गोळीबार केला. 


इतर महत्वाच्या बातम्या