Kolhapur News : कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा (Internet Service) आता पूर्ववत झाली आहे. शिवराज्याभिषेक दिनाला कोल्हापूर शहरातील तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवल्याने मोठा राडा  (Kolhapur Violence) झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि अफवा पसरु नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 


मागील 38 तासांपासून कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद होती. परिणामी नागरिक आपले व्यवहार करु शकत नव्हते. इंटरनेटचा वापर करु शकत नव्हते. कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये आणि अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अनेक कामं खोबळंबली होती, बँकेचे तसंच इतर व्यवहार ठप्प झाले होते. आता इंटरनेट सेवा सुरु झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे कोल्हापुरात वादाची ठिणगी


शिवराज्याभिषेक दिनाला कोल्हापूर शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथेच वादाची ठिणगी पडली. या स्टेटसविरोधात काल (7 जून) हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कार्यकर्ते आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले, नंतर ते मोर्चा काढणार होते. पण मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केली. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. कोल्हापुरात शिवाजी चौक परिसराला लागून असलेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाग, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला तसेच शिवाजी रोड आदी ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आल्या. अखेर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अश्रुधुराचाही वापरही करण्यात आला. दुपारी साडे बाराच्या सुमाराला स्थिती नियंत्रणात आली. या राड्यानंतर अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.


अंबाबाईच्या भाविकांच्या संख्येत हळूहळू वाढ


7 जून रोजी कोल्हापुरात उसळलेल्या हिंसाचारानंतर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये घट झाली होती. बाहेरील भाविक कोल्हापूरमध्ये येण्यास फेरविचार करत होते. मात्र आता कोल्हापूर शहराच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेरुन भाविक करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. आज सकाळपासून मुकदर्शन आणि दर्शन रांगेतून 10 हजार भाविकांनी दर्शन घेतलं. गेल्या शुक्रवारी साधारण सकाळी 9 वाजेपर्यंत 17 ते 18 हजार भाविकांनी दर्शन घेतलं होतं. दरम्यान कोल्हापुरातील राड्यानंतर देवीच्या भाविकांमध्ये मात्र 50 टक्क्यांनी घट झालेली पाहायला मिळत होती. 



संबंधित बातमी


Kolhapur Band : कोल्हापूर शहरातील वादानंतर स्थिती नियंत्रणात, इंटरनेट सेवा बंद