कोल्हापूर : गेल्यावर्षी जून महिन्यात बालिंगा रोडवरील कात्यायनी ज्वेलर्सवर भरदिवसा गोळीबार करून सशस्त्र दरोडा पडल्यानंतर अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यात थरकाप उडाला होता. या दरोड्यातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात नऊ महिन्यांनी कोल्हापूर पोलिसांना यश आलं आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदौरमध्ये सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी अंकित उर्फ छोटु श्रीनिवास शर्मा (वय 23, रा.पुठ रोड, एमएलडी कॉलनी, अम्बाह, जि.मुरैना, राज्य मध्यप्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या तो न्यायालयीने कोठडीत आहे.


कोल्हापूर पोलिसांनी त्याच्याकडून ह्युंडाई वेरणा कार, 4 अँड्राईड मोबाईल, 1 वायफाय डोंगल, एक की पॅड मोबाईल, 2 व्होडाफोन सिमकार्ड असा एकुण 6,58,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत कोल्हापुरात आणण्यात आले. त्याच्याकडून 9,04,140 रुपये किंमतीची 150 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, दोन पिस्टल व 7 जिवंत काडतुसे असा एकूण 16 लाख 25 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 


आतापर्यंत किती आरोपींना अटक?


सतीश उर्फ संदिप सखाराम पोहाळकर, विशाल धनाजी वरेकर आणि अंबाजी शिवाजी सुळेकर  तीन स्थानिक आरोपींना अटक करणेत आली होती. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आणखी तीन आरोपींचा शोध सुरु असताना भुपेंद्र उर्फ भुपेश उर्फ राणा गजराजसिंग यादव उर्फ पवन शर्मा यांना अटक केली होती. अजूनही दोन आरोपींचा शोध सुरु आहे. परप्रांतीय आरोपींकडून 6 लाख 45 हजार 130 रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व 4 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. 


गेल्यावर्षी जून महिन्यात दरोडा 


गेल्यावर्षी 8 जून 2023 रोजी कात्यायनी ज्वेलर्समध्ये चार चोरट्यांनी प्रवेश करुन दुकानात व दुकानाबाहेर अंधाधुंद गोळीबार करुन जवळपास पावणे दोन कोटींचे दागिने लंपास केले होते. तसेच दीड लाख रुपये चोरुन पुन्हा बेछुट गोळीबार दोन मोटरसायकलींवरुन गगनबावडा दिशेने निघून गेले होते. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, संजय कुंभार, अमित मर्दाने, विनोद कांबळे, विलास किरोळकर, राजेंद्र वरंडेकर, सागर चौगले यांचे पथकाने केली.


इतर महत्वाच्या बातम्या