Kolhapur Crime : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आत्महत्यांचे (Kolhapur Crime) सत्र थांबता थांबेना असं झालं आहे. वयाच्या विशीपासून ते तिशीपर्यंत आत्महत्या करणाऱ्यांची मालिकाच सुरु असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर (वय 40 वर्षे) यांनी आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केल्याची घटना घडली. डॉक्टरनेच आत्महत्या केल्याने मुरगूड शहरात खळबळ उडाली. हा प्रकार रविवारी (12 मार्च) उघडकीस आला.


'आत्महत्येला कोणाला जबाबदार धरु नका'


दरम्यान, डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, असा उल्लेख केला आहे. "मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मी चांगला बाप होऊ शकलो नाही, मी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, मी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये," असा मजकूर लिहिला असल्याचे पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळचे नाणीबाई चिखली (ता. कागल) येथील डॉक्टर आपल्या कुटुंबीयांसह मुरगूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून राहत आहेत. त्यांचा आधी कागलमध्ये दवाखाना होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुरगुडमध्ये बाजारपेठेत 'ओम क्लिनिक' नावाने दवाखाना सुरु केला होता. 


तिसऱ्या मजल्यावर केली आत्महत्या


रविवारी दुपारच्या सुमारास याच दवाखान्याच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर नायलॉनच्या दोरीने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद शिवाजी कुंभार यांनी मुरगूड पोलिसात दिली. दरम्यान, महेश गेली दहा वर्षे यमगे गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मुरगुडमध्ये स्टॅन्ड परिसरात 'ओम क्लिनिक' नावाने दवाखाना सुरु केला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बीएचएमएस शिक्षण घेतले होते. कोरोना काळातही त्यांनी यमगेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते अशी माहिती समोर आली आहे. 


कोल्हापुरात जानेवारीत तब्बल 75 आत्महत्या 


दरम्यान, कोल्हापुरात आत्महत्यांचे सत्र सुरुच असल्याने कोल्हापूर पोलिसांकडून आता पुढाकार घेत प्रबोधनाचा जागर करण्यात येत आहे. दिवसाला दोन आत्महत्या होत असल्याने अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी प्रबोधनाची मालिका सुरु केली आहे. ‘जीवन सुंदर आहे, त्याचा उपभोग घ्या, सकारात्मक विचारांनी नैराश्‍य टाळा, असे संदेश देण्यात येणार आहे. निर्भया पथक, स्थानिक पोलिस ठाणे, पोलिस उपअधीक्षक यांच्या सहकार्याने 101 ठिकाणी व्याख्याने देण्याचा त्यांचा मानस आहे. याची सुरुवातही त्यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 75 आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे दिवसाला दोन आत्महत्या होत आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून आत्महत्या होऊ लागल्या आहेत. अवघ्या 12 दिवसांपूर्वीच कोल्हापुरातील मोरेवाडीत बारावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या