Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने (Hasan Mushrif ED Raid) तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर ते गेल्या 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आज त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत.
दरम्यान, एबीपी माझाच्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ ईडी कार्यालयात आज प्रत्यक्ष उपस्थित उपस्थित राहणार नाहीत. ते त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे धाडी पडल्या आहेत. त्यामुळे ते आज ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थिती लावणार का? याकडेही आता लक्ष लागलं आहे.
मुश्रीफांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
दरम्यान, नाॅट रिचेबल असलेल्या हसन मुश्रीफ यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, पक्षाकडूनही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. दुसरीकडे, आरोप प्रत्यारोप होत असताना मुश्रीफ अधिवेशनाला हजेरी लावली आहे. त्यामुळे ते आज विधानसभेत हजेरी लावणार की नाही? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दोन महिन्यात तीन वेळा छापेमारी
हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, अप्पासाहेब नलवडे कारखाना कर्ज प्रकरण तसेच ब्रिक्स कंपनीवरुन ईडीने दोन महिन्यात तीनदा छापेमारी केली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. शनिवारी (11 मार्च) ईडीच्या पथकाने चौकशीनंतर बाहेर पडताना ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांना समन्स बजावले होते. मात्र, संपर्क क्षेत्राबाहेर गेलेल्या मुश्रीफांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, ते व नाविद हे दोघेही मुंबईत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे. त्यामुळे ते ‘ईडी’ कार्यालयात हजर राहणार की वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर करणार, याची उत्सुकता होती.
किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर दोन वेळा, तर घोरपडे कारखाना व जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखांवर यापूर्वी ‘ईडी’ने छापे टाकले आहेत. जिल्हा बँकेतून या दोन कारखान्यांना दिलेली कर्जे नियमानुसार असल्याचा खुलासा बँकेने केला असला, तरी मुश्रीफ यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा पडला. शुक्रवारी (10 मार्च) रात्री मुश्रीफ कोल्हापुरात आले होते, असे समजते. मात्र, काल ‘ईडी’चा छापा पडल्यापासून त्यांचा फोन बंद आहे.
इतर महत्वाच्या बातम्या