Sanjay Raut on Hasan Mushrif : माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Hasan Mushrif) संतप्त झाले आहेत. त्यांनी हसन मुश्रीफ यांचा फोटो ट्वीट करत किरीट सोमय्यांचा 'महात्मा पोपटलाल' असा उल्लेख करत तोफ डागली आहे. डझनभर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट होताना ED गप्प का? अशी विचारणा त्यांनी ट्वीटमधून केली आहे.


ट्वीटमध्ये काय म्हणतात संजय राऊत?


मुश्रीफ यांच्या सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ED कारवाई सुरू आहे. महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. अशा डझनावर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. ED येथे गप्प का? उद्या एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्रजींकडे पाठवत आहे. संजय राऊत यांनी ईडीकडून मुश्रीफांवर छापेमारी झाल्यानंतरही सडकून टीका केली होती. आज त्यांनी पुन्हा ट्वीट करत सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. 






हसन मुश्रीफांवर कारवाईची टांगती तलवार 


दरम्यान, मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. उद्या (12 मार्च) मुंबईमधील ईडी कार्यालयात चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे. शनिवारी मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी करत कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर ईडीकडून समन्स बजावण्यात आले. तिसऱ्यांदा झालेल्या छापेमारीनंतर मुश्रीफ यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. 


सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडीकडून मुश्रीफांसह कुटुबीयांची चौकशी सुरु आहे. दोनवेळा ते घरी नसतानाच ईडीकडून छापेमारी झाली आहे. आतापर्यंत मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुरगूडमध्ये 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.


तिसऱ्या छापेमारीत काय घडलं?


दरम्यान, ईडीकडून मुश्रीफांच्या कागलमधील निवासस्थानी दिवसभरात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.  ईडीने कोणतीही कागदपत्रे सोबत नेलेली नाहीत. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा तसेच मुलगा आबिद मुश्रीफ यांच्यासह पाज जणांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनाही बोलावून मुश्रीफ यांच्यासंदर्भात माहिती घेतली असल्याचे समजते.  


इतर महत्वाच्या बातम्या