Kolhapur Crime: आजारी असलेल्या नातीला औषध दिलं की नाहीस? अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या वादातून मुलानेच बापावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तळाशीत घडली. निर्दयी मुलाने सपासप वार केल्याने वृद्ध वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात गंभीर उपचार सुरु आहेत. साताप्पा पिराजी चव्हाण (वय 65 वर्षे, रा. तळाशी) असे त्यांचे नाव आहे. संशयित हल्लेखोर मुलगा सुनील साताप्पा चव्हाण (वय 30 वर्षे) याला राधानगरी पालिसांनी अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुलगा सुनीलने दारुच्या नशेत वडिलांवर हल्ला केला. त्याने कोयत्याने सपासप वार केल्याने वृद्ध पिता रक्ताच्या थारोळ्यात पडला. सोमवारी (22 मे) दुपारी घडलेल्या या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. मुलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर झाल्यानंतर साताप्पा यांना तातडीने रुग्णवाहिकेने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नातीला औषध दिलं की नाही विचारताच कोयत्याने हल्ला
हल्लेखोर संशयित सुनीलला दोन मुली असून तो सेंट्रिग कामगार आहे. त्याची लहान मुलगी दुर्वाला जुलाब होऊन त्रास होत असल्याने जुलाब कमी होण्याच्या औषधाच्या गोळ्या दिल्यास काय, अशी विचारणा मुलगा सुनीलकडे केली. यावेळी भर दुपारीच दारुच्या नशेत असलेल्या सुनीलने वडिलांशी भांडणास सुरुवात केली. सुनीलची पत्नी सुनीताने दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण रागाचा पारा चढलेल्या सुनीलने धारदार कोयत्याने जन्मदात्यावर हल्ला केला.
कोयत्याचा घाव डोक्यात वर्मी लागल्याने साताप्पा चव्हाण घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेनंतर ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. सुनीलची पत्नी सुनीता आणि गावकऱ्यांनी जखमी साताप्पा यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डोक्यातील अतिरक्तस्त्रावामुळे साताप्पा चव्हाण यांची प्रकृती गंभीर आहे.
करणी केल्याच्या संशयातून घरात घुसून खून
दरम्यान, सहा दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात सहकुटुंब घरात जेवत असताना करणी केल्याच्या संशयातून घरात घुसून तलवारीने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. आझाद मुकबुल मुलतानी (वय 48 वर्षे) असे मृताचे आहे. त्यांच्यावर वार होत असल्याने प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या सुनेवरही वार केल्याने ती सुद्धा जखमी झाले आहे. हल्लेखोर निखिल रवींद्र गवळी (वय 22 वर्षे) स्वत:हून राजाराम पोलिसांकडे हजर झाला. सहकुटुंब जेवत असतानाच तलवारीचे घाव घातल्याने घरात रक्ताचा सडाच पसरला. टेंबलाई उड्डाणपुलाशेजारी असलेल्या बीएसएनएल टॉवरसमोर असलेल्या झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली होती.
इतर महत्वाच्या बातम्या