Kolhapur Crime : करवीर तालुक्यात कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगे पुलाजवळ भोगावती नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला. महिला बेपत्ता असल्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांकडे देण्यात आलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी तक्रार नोंदवलेल्या संबंधितांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तो मृतदेह ओळखला. ऋतुजा स्वप्निल कांबळे (वय 22 वर्षे, रा. लक्ष्मी कॉलनी,टेंबलाईवाडी, कोल्हापूर) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. पती स्वप्नीलने मृतदेह ऋतुजाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली. 


महिलेचा मृतदेह नदीत पाण्यावर तरंगताना दिसला 


मिळालेल्या माहितीनुसार बालिंगा पुलाजवळ भोगावती नदी पात्रात नागदेववाडीमधील तरुण शनिवारी (1 जुलै) सायंकाळी चारच्या सुमारास पोहण्यासाठी गेल्यानंतर महिलेचा मृतदेह नदीत पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर तरुणांनी संबंधित घटनेची माहिती बालिंगा पोलीस पाटील सुरेश पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी करवीर पोलिसात माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 


राजारामपुरी पोलिसात महिला बेपत्ताची तक्रार असल्याने ओळख पटली 


करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तत्पूर्वी, राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी येथून ऋतुजा कांबळे पहाटे साडेचार वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद पती स्वप्निल तानाजी कांबळे याने दिली होती. त्यामुळे फिर्यादीमधील वर्णनाप्रमाणे या महिलेची वेशभूषा असल्याने ओळख पटवण्यासाठी ऋतुजाचा पती स्वप्नील आणि नातेवाईकांना करवीर पोलिसांनी बोलावून घेतले. स्वप्नीलने मृतदेह ऋतुजा असल्याचे ओळखले. करवीर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. 


एकाचवेळी चार मानवी कवट्या सापडल्याने खळबळ


दुसरीकडे, जिल्ह्यातील कागल तालुक्यातील (Kagal) सिद्धनेर्लीपैकी नदीकिनारा या ठिकाणी शनिवारी (1 जुलै) सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांना दुधगंगा नदीपात्रात चार मानवी कवट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी नागरिकांनी पोलीस पाटील उद्धव पोतदार यांना माहिती दिली. पोलीस पाटील पोद्दार यांनी तात्काळ कागल पोलिसांना घटनेची माहिती दिली. कागल पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी पाहणी करुन नदीपात्रातील मानवी कवट्या ताब्यात घेतल्या. 


अघोरी कृत्य की घातपात?


काही दिवसांपूर्वीच सिद्धनेर्ली, बामणी या गावामध्ये परप्रांतीय भोंदू बाबा आढळून आले होते. आता एकाच ठिकाणी चार कवठा आढळून आल्याने हा अघोरी कृत्याचा प्रकार तर नाही ना? याबाबत चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर अन्यत्र घातपात करुन याठिकाणी कवट्या आणून टाकलेल्या नसाव्यात ना? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या