Kolhapur Weather Update: संपूर्ण जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur News) मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीमध्ये पेरणीयोग्य ओलावा झाल्याने शेती कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होत असून पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 


राधानगरी, शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यात दमदार पाऊस 


गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यातील आजरा तालुक्याचा अपवाद वगळता सर्व धरणांमध्ये दमदार पावसाची नोंद झाली. जून महिन्यात पाऊस न झाल्याने धरणाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्याचबरोबर नद्यांनी सुद्धा तळ गाठला होता.  जून महिन्यामध्ये पूर्णतः पावसाने दडी मारल्याने परिस्थिती बिकट झाली होती. गगनबावडा तालुक्यातील कोदे धरणात गेल्या 24 तासात 91 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर कुंभी धरणक्षेत्रात 86 मिमी पावसाची नोंद झाली. त्यानतंर सर्वांधिक 85 मिमी पावसाची नोंद भुदरगड धरणातील पाटगाव धरणक्षेत्रात झाली. तुलनेत धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या राधानगरीमधील तुळशी, दुधगंगा आणि राधानगरी धरणात तुलनेत कमी पावसाची नोंद गेल्या  24 तासांमध्ये झाली आहे. राधानगरी (39), तुळशी (51) आणि दुधगंगा धरणक्षेत्रात 15 मिमी पावसाची नोंद झाली. 


जिल्ह्यातील केवळ दोन धरणांमधून पाण्याचा विसर्ग 


दरम्यान, धरणांनी तळ गाठल्याने जिल्ह्यातील केवळ दोन धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तुळशी धरणातून 50, तर  वारणा धरणातून 250 क्युसेक  पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अन्य कोणत्याही धरणातून विसर्ग सध्या सुरु नाही. दुसरीकडे, कोयना धरणात पाण्याची आवक सुरु झाली आहे. धरणातून सध्या 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुर आहे, तर आवक 9129 क्युसेकने सुरु आहे. अलमट्टी धरणातून कोणत्याही प्रकारची आवक सुरु झालेली नाही. केवळ 590 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 


कोल्हापुरात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा 


दुसरीकडे, 2 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, कोकणसह कोल्हापूर जिल्ह्यात 3 आणि 4 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातही 3 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्याला मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या