Kolhapur News: दोन लहान मुलांच्या भांडणात पालक भिडल्याने एका पालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये घडली. सद्दाम सत्तार शेख (वय 27 , रा. स्वामी मळा, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. हा भयानक प्रकार कोले मळा येथील एका शाळेत घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सद्दामच्या मृत्यू प्रकरणी शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) याच्यासह दोन महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सद्दामच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी संशयित शब्बीरच्या दारावर लाथा मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. 


मुलांचा खेळता खेळता वाद


दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिलीच्या वर्गात टेम्पोचालक असलेला सद्दाम शेख, सलमा आलासे यांची मुले शिकत आहेत. खेळता खेळता सलमाच्या मुलाचा शेखच्या मुलाशी कारणातून वाद झाला. वादातून आपल्या मुलाला मारल्याचा राग आल्याने सद्दामने सलमाच्या मुलास कानफटात दिली. या वादावर शिक्षकांनी सद्दामची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पाडला होता, पण सलमाला मुलाला मारहाण झाल्याचे समजलल्यानंतर भाऊ शब्बीरला शाळेत बोलावून घेतले. यावेळी सलमाने मुलाच्या मारहाणीचा जाब विचारला. यातून शेख आणि गवंडी यांच्यात वाद झाला आणि त्यातून एकमेकांच्या अंगावर धावून गेले. 


झटापटीत सद्दाम जमिनीवर कोसळला 


दोघांमध्ये झटापट आणि लाथाबुक्क्यांनी मारामारी झाल्याने शेख जमिनीवर कोसळला. हा राडा पाहून शाळेत शेखच्या नातेवाईकांसह भागातील नागरिकही जमले. त्याला तातडीने शेखला दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र शेख यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे शिक्षकांनी वाद मिटवूनही मुलांचे पालक शाळा सुटताना पुन्हा आल्याने परत वादाला तोंड फुटून एकाचा जीव गेला आहे. 


पंचगंगेत झोकून दिलेल्या तरुणाचा शोध सुरूच


दरम्यान, पंचगंगा नदी पात्रात उडी घेतलेल्या विनोद शिकलगार (वय २९, रा. यड्राव फाटा) याचा 24 तासानंतरही शोध लागला नाही. महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने नदीपात्रात आज घटनास्थळापासून सुमारे 10 किलोमीटरपर्यंत शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही.  टाकवडे, अब्दुललाटसह शिरढोण बंधाऱ्यापर्यंत पथकाने शोध घेतला. पुतण्या गणेशसमोर विनोद शिकलगारने मोठ्या पुलावरून थेट नदीत उडी मारली होती. त्यानंतर विनोदच्या पत्नीनेही नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला वाचवण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या