Kolhapur Crime : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील प्रेमप्रकरणातून तरुणाने वारणा नदीत उडी मारून जीव दिल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना इचलकरंजीमध्ये घडली आहे. कौटुंबिक वादातून भरून वाहत असलेल्या पंचगंगा नदीत इचलकरंजीमध्ये एका तरुणाने पुलावरून झोकून दिले. पाण्याचा वेग असल्याने तो बेपत्ता झाला आहे. पतीने उचललेल्या टोकाच्या पावलानंतर घटनास्थळी जाऊन पत्नीने तसाच प्रयत्न केला, पण उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत रोखल्याने जीव वाचला आहे. 


कुटुंबातील प्रत्येकाचे आशीर्वाद घेत घराबाहेर पडला 


विनोद शब्बीर शिकलगार (वय 29, रा. यड्राव फाटा परिसर) असे पंचगंगा नदीत उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने उडी घेतल्याचे समजताच इचलकरंजी पोलिस, महापालिका आपत्कालीन विभाग पथक घटनास्थळी पोहोचले. त्याचा शोध घेऊनही सापडलेला नाही. मंगळवारी ही घटना घडली असूनही अजूनही त्याचा शोध सुरु आहे. विनोदने कुटुंबातील प्रत्येकाचे आशीर्वाद घेत घराबाहेर पडला होता. नातेवाइकांना फोन करण्यास सुरुवात केली होती. शेवटी नदीवरील मोठ्या पुलावर आल्यावर शेवटचा कॉल  बहिणीला केला. पण न बोलताच त्याने मोबाइल पुतण्याकडे देत नदीत उडी घेतली.


कौटुंबिक वादात टोकाचा निर्णय 


कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद 12 वर्षीय पुतण्या गणेशसह घराबाहेर पडला. त्यानंतर घरापासून दुचाकीवरून ते दोघेजणा पंचगंगा नदीच्या काठावर पोहोचले. याठिकाणी ते मोठ्या पुलावर पोहोचले. विनोदने खिशातील मोबाईल काढून बोलण्यासाठी गणेशकडे दिला. त्यानंतर क्षणार्धात त्याने थेट पुलावरून नदीत उडी मारली. उडी मारताच पुतण्याने आरडाओरडा केला. पुलावर ये-जा करणाऱ्यांपैकी थांबून मदतीसाठी धावले, पण विनोद वाहून गेला होता. पती विनोद नदीत उडी घेतल्याचे समजताच पत्नीसह नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. पती नदीत वाहून गेल्यानंतर विनोदच्या पत्नीनेही लहान पुलावरून नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाइकांनी वाचवल्याने जीव वाचला.  


वारणा नदीत उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला


दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथील तुषार पांढरबळेचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील भेंडवडेमध्ये वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला. मयत तुषारचा मूळ ठिकाणापासून तब्बल 40 किमी दूर वारणा नदीपात्रात मृतदेह सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरुन वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती. प्रेम प्रकरणातून मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत त्याने उडी घेतली होती. नदीचे पाणी पात्राबाहेर असल्याने शनिवारी रात्र झाल्याने शोध घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी एनडीआरएफच्या 20 जणांच्या पथकाने शोध सुरु केला. दरम्यान, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पातळी कमी झाली होती. पाण्याची पातळी सुमारे सात फुटांनी कमी आल्याने पाणी पात्रात गेले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या :