Kolhapur Crime: कोल्हापूरसह सांगली पोलिस दलात खळबळ उडवून दिलेल्या मार्च 2016 मधील नऊ कोटींच्या रोकड दरोडा प्रकरणातील निलंबित एपीआय सूरज विष्णू चंदनशिवेचा (वय 43, रा. वासूद, ता. सांगोला) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील वासूदमध्ये निर्घृण खून झाला. बुधवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. त्यामुळे या रोकड दरोडा प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. वारणानगरमधील बेहिशेबी नऊ कोटी रोकड दरोडा प्रकरणात एपीआय सूरज चंदनशिवे 19 एप्रिल 2017 मध्ये निलंबित झाला होता. त्याला दोन महिन्यांपूर्वीच सेवेतून बडतर्फही करण्यात आले होते. 


या प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्लाचा सुद्धा 29 जानेवारी 2023 रोजी सांगलीत खून झाला होता. त्यामुळे एकाच प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासह मुख्य आरोपीचा सुद्धा मुडदा पडल्याने भूवया उंचावल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे मोहिद्दीन मुल्लाच्या मारेकऱ्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. असे असतानाच आता एपीआयचाच खून झाल्याने कोल्हापूर ते पार सोलापूर पोलिस दलापर्यंत खळबळ उडाली आहे. सांगली पोलिस दलातील पोलिसांनीच वारणानगरमध्ये रोख रकमेवर टाकलेल्या दरोड्याने खाकी वर्दीची लक्तरे वेशीला टांगली गेली होती.  


खून नेमका कसा झाला? 


सूरज चंदनशिवे बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर नेहमीच्या सवयीने शतपावली करण्यासाठी गेला होता. मात्र, शतपावली करून घरी न परतल्याने त्याची पत्नी मनीषाने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पत्नी मनीषाने सौरभ चंदनशिवे यांना माहिती दिली. सौरभ यांनी तातडीने पंढरपुरातून वासूद गाठत   केदारवाडी ते सांगोला रस्त्यावर  शोध सुरू केला. शोध घेतानाच पहाटे साडेचारच्या सुमारास हनुमंत विद्यालयाच्या पुढे काही अंतरावर केदारवाडी रस्त्यावर रक्त सांडलेले व चपलाचा जोड दिसून आला. त्यामुळे उसाच्या शेतात पाहणी केली असता शेतात सूरज चंदनशिवे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तेथून रुग्णवाहिकेतून सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


दोन महिन्यांपूर्वी पोलीस दलातून बडतर्फ


मयत सूरज विष्णू चंदनशिवे हा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. 2018 मध्ये वारणानगरमधील दरोडा प्रकरणातून सूरज चंदनशिवेवर गुन्हा दाखल होऊन निलंबनाची कारवाई झाली होती. वर्षभरापूर्वी निलंबन मागे घेऊन सध्या सांगली पोलिस मुख्यालयात कंट्रोल विभागात कार्यरत होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी सूरज चंदनशिवेला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.


सहा पोलिसांचे निलंबन 


वारणा दरोडा प्रकरणात सांगली पोलिस दलातील गुन्हा दाखल झालेल्या 7 पैकी 6 पोलिसांचे तत्कालिन सांगली जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी निलंबन केले होते. आता हा तपास सीआयडीकडे वर्ग झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, हवालदार शंकर पाटील, पोलीस नाईक रविंद्र पाटील आणि हवालदार कुलदीप कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.


सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये झोपडीवजा घरावर छापा टाकून तेथून तीन कोटीची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी मैनुद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत त्याने ही रक्कम वारणानगर येथून चोरल्याची कबुली दिली होती. गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुल्लाला सोबत घेऊन वारणानगरला छापा टाकून तिथेही कोट्यवधीची रोकड जप्त केली होती. पण या कारवाईवेळी पथकाने सव्वानऊ कोटीची रोकड परस्पर हडप केली होती. हा प्रकार तब्बल वर्षभरानंतर उघडकीस आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. 


वारणानगर दरोडा प्रकरण आहे तरी काय?


वारणानगर रोकड दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला वारणानगर येथील शिक्षण संस्थेमध्ये वाहन चालक म्हणून काम करत असतानाच त्याला एका इमारतीमध्ये मोठी रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या रकमेवर मुल्लाने पहिल्यांदा डल्ला मारला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सांगली एलसीबीकडून मुल्लाला घेऊन रोकड असलेल्या ठिकाणी झाडाझडती करण्यात आली होती. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना  माहिती न देता सांगली पोलिसांकडूनही मोठ्या रकमेवर डल्ला मारण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण कोल्हापूर पोलिसांच्या तपासात उघडकीस आल्यानंतर सांगली एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि सात पोलिसांवर गुन्हा दाखल झाला होता. 


दुसरीकडे, सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिवे याने सहकार्‍यांसोबत वारणानगरमध्ये जाऊन मोठ्या रकमेवर डल्ला मारला होता. तसेच वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती दिली नव्हती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार सुद्धा झाला होता. त्यानंतर निलंबन मग सेवेतून बडतर्फ आणि आता आयुष्याचा निर्घृण शेवट असा एपीआय सूरजच्या आयुष्याची शोकांतिका झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या