Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने गेल्या 24 तासांसून जोर लावला आहे. जोराच्या सरी आणि परत उघडीप असा प्रकार सुरु आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 45.6  मिमी पाऊस पडल्याची नोंद  झाली. कोल्हापूर शहरातही पावसाची उघडझाप सुरु आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाच्या पुन्हा सरीवर सरी सुरु आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पात्राबाहेर असलेली पंचगंगा नदी आता पात्राच्या नजीक पोहोचली आहे. राधानगरी धरणातून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्गाने पाणीपातळी हळूहळू कमी होत आहे. बऱ्याच दिवसांपासून पीके पाण्याखाली असल्याने अडचणी वाढल्या आहेत.


पूर, पाऊसबाधित पिकांचे पंचनामे करा


दरम्यान, पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. महसूल व कृषी विभागाकडून हे पंचनामे केले जाणार आहेत. यामध्ये ऊस पिकाव्यतिरिक्त भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर कडधान्यांचे पंचनामे केले जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे. तसेच पुरामूळे पिके पाण्याखाली गेली होती. या पिकांचे पंचनामे करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. शक्यतो जास्त पिकांचे नुकसान झालेले नसल्याचेही रेखावार यांनी सांगितले.


जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस 


हातकणंगले- 2.5 मिमी, शिरोळ - 2.2 मिमी, पन्हाळा- 11.9, शाहूवाडी- 14.9  मिमी, राधानगरी- 21.5 मिमी, गगनबावडा-45.6, करवीर- 8.4 मिमी, कागल- 8.1, गडहिंग्लज- 3.9 मिमी, भुदरगड- 29.9, आजरा-14.8 मिमी, चंदगड- 12.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 


जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली;  राधानगरी धरणातून 4256 क्युसेक विसर्ग


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप आणि राधानगरी धरणातून विसर्ग सुरुच असल्याने 22 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. आज (4 ऑगस्ट) सकाळी सात वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक  5 व 6 उघडले आहेत. त्यामधून भोगावती नदीपात्रात 4 हजार 256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.


जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली?



  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ

  • भोगावती नदी : तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.

  • वारणा नदी : चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची व शिगांव.

  • दुधगंगा नदी : दत्तवाड

  • कासारी नदी : यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे,  आळवे


बंधाऱ्यांची पाणी पातळी 


राजाराम 29 फूट, सुर्वे 28.7 फूट, रुई 57.9 फूट, इचलकरंजी 54.6, तेरवाड 48.9 फूट, शिरोळ 41.6 फूट, नृसिंहवाडी 41 फूट, राजापूर 29.3 फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 14.3 फूट व अंकली 19.4  फूट अशी आहे.


जिल्ह्यातील धरण पाणीसाठा


कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये. राधानगरी 8.28 (8.361 टीएमसी), तुळशी 2.44 (3.471 टीएमसी), वारणा 29.17  (34.399 टीएमसी), दुधगंगा 19.37 (25.393 टीएमसी), कासारी 2.53 (2.774 टीएमसी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.35 (2.715 टीएमसी), पाटगाव 3.22 (3.716 टीएमसी), चिकोत्रा 1.17 (1.522 टीएमसी), चित्री 1.79 (1.886 टीएमसी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टीएमसी ) आंबेओहोळ  1.21 (1.240 टीएमसी ) आणि कोदे ल. पा. 0.21 (0.214).


इतर महत्वाच्या बातम्या