Hasan Mushif on Gokul : राज्यातील बंद पडलेले दूध संघ गोकुळने घेऊन ते चालवले पाहिजेत, असे महत्त्वपूर्ण विधान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushif on Gokul) यांनी केलं आहे. गोकुळकडून उत्पादित करण्यात आलेल्या गोकुळ फ्लेवर मिल्क (सुंगधित दूध) शुभारंभ प्रसंगी बोलताना मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते. गोकुळने सुगंधीत दूध हे स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनीला व चॉकलेट या चार प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध केलं आहे. येत्या काळात मसाला ताक, मॅगो लस्सी व व्हेनिला लस्सी टेट्रापॅकमध्ये पॅकिंग करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. 


हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, गोकुळने आता सुगंधी दुधात प्रवेश केला आहे. गेल्या काही काळांपासून ग्राहकांकडून सुगंधीत दुधाची (फ्लेवर मिल्क) वारंवार मागणी केली जात होती. ती मागणी लक्षात घेऊन गोकुळच्या संचालक मंडळाने 200 मिली बॉटलमध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. फ्लेवर दूध हे गोकुळच्या उच्च दर्जाच्या व नैसर्गिक दुधापासून तयार केलं आहे. हे दूध डबल टोन्ड दुधापासून तयार केलेले असून त्यावर उच्च दर्जाची प्रकिया केल्याने सामान्य तापमानाला 180 दिवस टिकणारे आहे. त्यामुळे गायीच्या दूधाचा वापरही वाढणार आहे, सुगंधीत दूध तयार करतांना वापरलेले कलर व फ्लेवर हे उच्च दर्जाचे व फुडग्रेड क्वॉलीटीचे असल्याने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा मला विश्वास आहे. 


गोकुळकडून सध्या फुल क्रिम व गाय दुधाची विक्री कोल्हापूर, सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्याबरोबरच पणजी (गोवा), पुणे व मुंबई ठाणे जिल्ह्यात केली जात आहे. सध्या दररोज सरासरी 14 लाख 50 हजार लिटर पर्यंत दुधाची विक्री केली जात आहे. दुधाबरोबरच गोकुळच्या दही, ताक, पनीर, लस्सी, टेबल बटर, श्रीखंड, फ्रुटखंड, आम्रखंड, बासुंदी, टेट्रापॅक मधील दूध व तूप इत्यादी पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 


कोल्हापुरात जानेवारीत इंडियन डेअरी फेस्टिव्हल


काही वर्षांपूर्वी मेगा मिल्क डेअरी इव्हेंट सुरू झाल्यानंतर प्रथमच ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल-2023’ (Indian Dairy Festival In Kolhapur) आयोजित करण्यासाठी कोल्हापूर शहराची निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव 20 जानेवारीपासून तीन दिवस चालणार आहे. यात खासगी व सहकारी दूध डेअरीचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि विविध डेअरी उत्पादने, यंत्रसामग्री आणि व्यवसाय योजनांचे प्रदर्शन पाहायला मिळेल. इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून कोल्हापुरात 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे (Indian Dairy Festival In Kolhapur) आयोजन करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या