Dr Babasaheb Ambedkar : वर्णव्यवस्थेत हजारो वर्ष रंजल्या गांजल्या आणि गावकुसाबाहेर जीवन घालवलेल्या जीवांसाठी आयुष्य वेचलेल्या महामानवाची 14 एप्रिलला 132 वी जयंती साजरी होत आहे. तो महामानव होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. या युगपुरुषाच्या महतीवर आज देश वाटचाल करतो आहे. प्रगल्भ लोकशाहीची बिरुदावली मिरवतो आहे. जगभरातील कायद्यांचा अभ्यास करून देशाला सर्वसमावेशक घटना देणाऱ्या या धुरंदर व्यक्तीमत्वाची चुणूक सर्वप्रथम करवीर संस्थानचे छत्रपती शिवछत्रपतींचे वंशज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांना आली होती. 


एक अस्पृश्य जातीमधील उमदा तरूण परदेशातून शिकून आल्यानंतर त्याला भेटण्यासाठी स्वत: शाहू महाराज मुंबईमध्ये  गेले होते. अस्पृश्य निर्मृलनासाठी लढा देणाऱ्या या दोन युगपुरुषांमधील संबंध अत्यंत स्नेहाचे आदराचे होते. बाबासाहेबांना  शिक्षणासाठी शाहू महाराजांनी मदत केली होती. कोल्हापुरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत माणगाव परिषद झाली. राज्यात पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा वारसा अभिमानाने सांगितला जातो. यामधील शाहू आणि आंबेडकर या द्वयींमधील मैत्री आणि स्नेह समतेच्या इतिहासात अजरामर झाला आहे. इतिहासकार डाॅ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" या पुस्तकामध्ये  दोघा युगरुपरुषांच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे. 


आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट कशी झाली?


शाहू महाराजांनी करवीर संस्थानात पददलितांच्या सर्वसमावेशकतेसाठी लढा सुरु केला होता. हा सामाजिक लढा सुरु असतानाच परदेशातून उच्च पदव्या घेऊन एक अस्पृश्य समाजातील तरुण हिंदुस्थानात परतल्याची माहिती शाहू महाराजांना मिळाली. आणि तो तरुण होता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना भेटण्यासाठी महाराजांनी निश्चय केला. महाराजांसोबत असलेल्या आर्टिस्ट दत्तोबा दळवी यांनी बाबासाहेबांचा मुंबईमधील पत्ता शोधून काढला. दत्तोबांना घेऊन महाराज मुंबईमधील परळ चाळीमध्ये पोहोचले. करवीरचे छत्रपती शाहू महाराज स्वत: भेटण्यासाठी आल्याचे समजताच बाबासाहेबांना अत्यानंद झाला. यावेळी महाराजांनी बाबासाहेबांच्या प्रतिभेचे कौतुक केले. चहापान झाल्यानंतर बाबासाहेबांना शाहू महाराजांनी करवीर भेटीचे निमंत्रण दिले. या भेटीपासून दोन युगपुरुषांचा स्नेह वाढत गेला तो शेवटपर्यंत राहिला. 


'मूकनायक'साठी मदत ते माणगाव परिषद 


शाहू महाराज आणि बाबासाहेबांची भेट झाल्यानंतर त्यानंतर वर्षभरात बाबासाहेबांनी अस्पृश्योद्धारासाठी 'मूकनायक' वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी मदत केली. यानंतर महाराजांच्या प्रेरणेतून (1920 Mangaon Parishad) कोल्हापुरात मार्च 1920 मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगावमध्ये अस्पृश्य समाजाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. बाबासाहेब या परिषदेचे अध्यक्ष होते. शाहू महाराजांनी या परिषदेला उपस्थिती लावली होती. 


ते (बाबासाहेब आंबेडकर) सर्व हिंदुस्थानाचे पुढारी होतील 


शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीची अन् प्रतिभेची पारख किती काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी होती याची प्रचिती अस्पृश्य समाजाच्या परिषदेच्या भाषणातून येते. शाहू महाराज बाबासाहेबांच्या प्रतिभेचा गौरव करताना म्हणतात, लोकहो तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला. यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. इतकंच नव्हे, तर एक वेळ अशी येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे. शाहू महाराज 6 मे 1922 रोजी निर्वतले, पण त्यांनी बाबासाहेबांची निरखलेली प्रतिभा काय होती हे सांगून जाते. 


बाबासाहेब आंबेडकर परिषदेत काय म्हणाले?


माणगाव परिषदेत अध्यक्षपदावरून बोलताना बाबासाहेब म्हणाले की, आपल्या राज्यात (कोल्हापूर संस्थानात) अस्पृश्यांना समानतेचा हक्क देऊन त्यांचा उद्धार केल्याबद्दल मी आभार मानतो. महाराजांचा वाढदिवस  प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा, असा ठरावही बाबासाहेबांनी या सभेत मंजूर करून घेतला. या परिषदेनंतर शाहूराजांनी बाबासाहेबांना सोनतळी कॅम्पवर नेऊन जरीपटका आहेर म्हणून दिला होता. यावेळी त्यांना गहिवरून आले होते. 


बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतरही महाराजांनी त्यांना मदत केली. दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरु होता. एका पत्रात ते म्हणतात, हिंदुस्थानात प्रगती करत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या महान चळवळीचे आपण आधारस्तंभ आहात. महाराजांनी मुंबईत 6 मे 1922 रोजी देह ठेवल्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराजांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी ते इंग्लंडमध्ये होते. ते आपल्या शोकसंदेशात म्हणतात, हा प्रसंग माझ्यासाठी दोन घटनांमुळे दु:खदायक आहे. मी एका वैयक्तिक मित्राला गमावलं आहे आणि अस्पृश्य समाज आपल्या एका महान हितचिंतकाला व सर्वात महान कैवाऱ्याला मुकला आहे. 1927 साली सुद्धा बाबासाहेबांनी अखिल अस्पृश्य समाजाकडून कृतज्ञता व्यक्त केली होती. 



  • संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती महाराज  लेखक -  डाॅ. जयसिंगराव पवार 


इतर महत्वाच्या बातम्या