Almatti dam : कोल्हापूर, सांगली तसेच सांगली जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ सुरु झाली आहे. त्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून 1लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.


एक दिवसापूर्वी अलमट्टी धरणातून विसर्ग जेमतेम 450 क्युसेक्स सुरु होता. धरणात 83.8 हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणीसाठा होता. अलमट्टी धरणाची एकूण क्षमता 123 टीएमसी आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळी वेगाने वाढ होत असून ती आता 18 फुटांवर गेली आहे. कोयना धरणातून कृष्णेच्या नदीपात्रात विसर्ग सुरु झालेला नाही. मात्र, कोल्हापूर, सांगली तसेच सातारमध्ये होत असलेल्या दमदार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 


कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने 24 तासांत धरणात सुमारे 2.8 टीएमसी पाण्याची भर पडली. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वरमध्ये 81 मिमी, नवजामध्ये 79 मिमी पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे. कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 73 मिमी पाऊस झाला.


भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सातारा आणि कोल्हापुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, कोल्हापूर शहरात हलक्या सरी पडल्या असून 18.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यात 11.4 मिमी पाऊस झाला. सांगली आणि सोलापूरमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला आहे. 14 जुलैपर्यंत दक्षिण महाराष्ट्रात आणखी पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.


पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वेगाने वाढ 


कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या (panchganga river water level)  पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी स्थलांतरासाठी तयार रहावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे. कोल्हापूर आणि परिसरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे.पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्याने रेखावार यांनी आवाहन केलं आहे.


पंचगंगा आणि कृष्णा नदीत पाण्याची आवक वाढल्याने अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या धरणातून 1 लाख क्यूसेक्स विसर्ग सुरू असल्याची माहिती देखील रेखावार यांनी दिली. स्थलांतराच्या आवाहनानंतर लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील जिल्हाधिकारी रेखावार यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या