Sangli Rain : संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढू लागली आहे. कृष्णेची पाण्याची पातळी आज सकाळी 18 फुटापर्यंत गेलेली दिसून आली. अद्याप कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू नसला, तरी देखील केवळ नदीच्या पात्रात पडणाऱ्या पावसाने ही पाणीपातळी वाढली आहे. दुसरीकडे मागील आठवड्याभरापासून चांदोली धरण परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 50 टक्के भरले आहे.


दुसरीकडे कृष्णा, वारणा नदीची वाढत असलेली पाणी पातळी लक्षात घेता अलमट्टी धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असून सध्या 75 हजार  क्यूसेक्सने अलमट्टी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चांदोली धरण परिसरात मागील आठवड्याभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे  धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.  
सहा दिवसांतील पावसाने धरण 50 टक्के भरले आहे. यंदा पाच जुलैपासून पावसाला सुरुवात झाली आणि त्यावेळेपासून चांदोली धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी होत आहे. मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात आठवड्याभरात तब्बल सात टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. 


चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी 


शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पावसाची संततधार कायम सुरूच आहे. गेल्या 24 तासात साठ मिलिमीटर तर आज अखेर 720 मिलिमीटर पावसाची नोंद झाले आहे. पाणलोट क्षेत्रातून 11 हजार 185 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. चांदोलीत गेल्या सहा दिवसापासून धुवाँधार पाऊस पडत आहे. पावसाने जोरदार सलामी दिल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.