कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) कागल तालुक्यातील (Kagal) बिद्री साखर कारखान्याच्या (Bidri Sakhar Karkhana) निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा यश मिळवलं आहे. हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि के पी पाटील यांच्या नेतृत्वात सत्ताधारी गटाने यश मिळवले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरु झाला आहे. अंतिम निकालासाठी सायंकाळ होणार असली, तरी निकाल स्पष्ट झाला आहे. कधी नव्हे ती इतक्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती. विरोधी गटात असलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांना देखील या निवडणुकीत उतरावे लागले. आबिटकर यांच्या परिवर्तन आघाडीत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आल्याने बदल होईल, असे वाटले होते. मात्र, ती आशा पूर्णत: धुळीस मिळाली आहे. 


कल दिसताच ए. वाय. पाटलांचा काढता पाय


बिद्री कारखान्यासाठी कोल्हापुरात मुस्कान लाॅनला मतमोजणी करण्यात आली. याठिकाणी परिवर्तन आघाडीचा मुख्य चेहरा असलेल्या ए. वाय. पाटील यांनी मतमोजणी केंद्रात हजेरी लावून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी सुरु झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिसताच ए. वाय. पाटील यांनी काढता पाय घेतला. 


के. पी. पाटलांनी फक्त तीन शब्दात कंडका पाडला! 


विजय आवाक्यात दिसू लागल्यानंतर बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांना शेतकरी सभासदांनी उचलून घेत जल्लोष केला. यावेळी बोलताना ए. वाय. पाटील यांच्याबाबत विचारले असता अत्यंत मोजक्या शब्दात टोला लगावला. ते म्हणाले की, विरोधकांनी केलेला दावा हा अतिशय चुकीचा होता. सातत्याने अपप्रचार करत होते. प्रचाराची पातळी खालावली होती. पैशाच्या जीवावर जंग करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला खात्री होती. आमच्यासोबत कार्यकर्ते, नेते होते. जनता आणि सभासद आमच्यासोबत होते. त्यामुळे यश मिळालं आहे. ए. वाय. पाटील यांनी काढता पाय घेण्यावर के. पी. पाटील यांनी काय करतील बिचारे? म्हणत खोचक टोला लगावला. मतपेटीतून ऊस उत्पादकांनी त्यांना उत्तर दिलं आहे. आजचा निकाल तेच सांगत आहे. 


बिद्री कारखान्याच्या निमित्ताने के. पी. पाटील आणि ए .वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करूनही त्यांच्यातील संघर्ष मिटण्याचे नाव घेत नसताना  ए. वाय. पाटील यांनी के. पी पाटील यांना धक्का दिला. ए. वाय. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या छावणीत जाऊन  के. पी. पाटील यांना टक्कर दिली आहे. खासदार संजय मंडलिक, भाजपचे नेते समरजिंतसिंह घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर व ए. वाय. पाटील विरुद्ध माजी आमदार के. पी. पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यात बिद्रीचे राजकारण पेटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या