बिद्री निकाल LIVE : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोल्हापुरातील मुस्कान लॉन परिसरात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 120 टेबलवर ही मतमोजणी होत आहे. या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. 


या निवडणुकीत एकूण 56 हजार 91 पैकी 49 हजार 940 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता 173 मतदान केंद्रावर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. दोन्ही आघाडीचे 50 उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन आणि चार अपक्ष अशा 56 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झालं आहे.


बिद्रीच्या मतपेटीतून चिठ्ठ्यांचा पाऊस


दरम्यान, मतपत्रिका एकत्र करताना सभासदांनी मतपेटीत टाकलेल्या अनेक चिठ्ठ्या मिळाल्या. यामध्ये सत्ताधारी गटाचे नेते के. पी. पाटील यांना कानपिचक्या दिल्या आहेत. कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना देव माफ करणार नाही, अशा आशयाच्या चिठ्ठ्या मिळाल्या आहेत.


काय म्हटलं आहे चिट्टीत?


के. पी. सायबा, तुम्ही हजारो रोजंदारीच्या जीवाशी खेळलात, त्यांचे करिअर उद्ध्वस्त केले. याला देवही माफ करणार नाही. 


दरम्यान, बिद्री साखर कारखान्यासाठी (Bidri Sakhar Karkhana) सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा दुरंगी सामना या निवडणुकीसाठी रंगला आहे. या निवडणुकीमुळे आगामी विधानसभेसाठी सुद्धा बरंच चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमकं या निवडणुकीमध्ये कोण लै भारी ठरणार? आणि कोणाचा कंडका पडणार? याचं उत्तर सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे. या निवडणुकीसाठी कधी नव्हे ती चुरस यावेळी निर्माण झाली आहे. रविवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. एक एक मतासाठी नेते घरोघरी फिरताना दिसून आले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी निश्चितच नसेल हे सुद्धा स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीसाठी तब्बल सात साखर सम्राट प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.


दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन जिल्हाध्यक्ष, गोकुळ अध्यक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी पूर्णतः विधानसभेची रंगीत तालीम एक प्रकारे पार पडली आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर अशा चार तालुक्यांमध्ये आहे.


इतर महत्वाच्या बातम्या