Ambabai Mandir Navratri : तब्बल दोन वर्षांनी कोणत्याही निर्बंधाविना होत शारदीय नवरात्रोत्सवामुळे श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये पहिल्याच माळेपासून भाविकांची दर्शनासाठी विक्रमी गर्दी होत आहे. पहिल्या दिवशी 85 हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर द्वितीय माळेला दीड लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. यामध्ये महिला भाविका शेकडो किमी प्रवास करन दर्शनासाठी अनवाणी पायाने येत आहेत.


मात्र, यांना मुलभूत सुविधा देण्यात कोल्हापूर जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हजारो महिला पायपीठ करून दर्शनासाठी येत असताना त्यांना मंदिर परिसरात शौचालय नसल्याने त्यांची चांगलीच कुचंबणा होत आहे. त्यामुळे ई पासचा विषय डोक्यात घेतल्याने भाविकांसाठी पायाभूत सुविधांचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


महिलांची पालकमंत्र्यांकडे कैफियत 


मंदिरात परिसरात शौचालय नसल्याने महिलांनी आपली कैफियत नुतन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मांडली होती. त्यानंतर प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली नाही. 


ई पासच्या वादात प्रशासन तोंडावर पडले


मंदिरात ई पास आणि व्हीआयपी रांगेवरूनही बराच गदारोळ झाला.न्यायालयीन आदेश असताना जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेने विसंवाद प्रकर्षाने दिसून आला. दिवाणी न्यायालयाने ई पास आणि व्हीआयपी दर्शन रांगेला परवानगी नाकारताना जिल्हा प्रशासनालाही खडे बोल सुनावले. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी करताना न्यायालयीन आदेशाचा विसर प्रशासनाला पडला होता का? असा प्रश्न उपस्थित होतो. 


मंदिर परिसरातील बारीक खडीचाही भाविकांना प्रचंड त्रास


कोल्हापूर शहरामध्ये पायाभूत सुविधांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. संपूर्ण शहरातील रस्ते कमी आणि त्यामधील गुडघाभर खड्डेच अधिक अशी विदारक अवस्था आहे. नवरात्रोत्सवामध्ये मंदिराकडे येणाऱ्या मार्गांवर खडी पसरण्याचा पराक्रम जिल्हा प्रशासनाकडून केला आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हामध्ये उपास असतानाही अनवाणी पायाने येणाऱ्या भाविकांना हे घाव सोसतच मंदिरात यावे लागत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या