Kolhapur illegal sex determination racket : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग रॅकेटप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. राधानगरी पोलिसांनी दिलीप बाळासो पवार (वय 37 वर्षे) आणि विजय बाळासो पवार (वय 40 वर्षे) या सख्ख्या भावांना अटक केली आहे. पवार बंधू गर्भलिंग निदान टोळीतील मुख्य सूत्रधार आहेत. राधानगरीच्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह एस. एम. यादव, उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, के. डी. लोकरे, हवालदार बी. डी. पाटील, सुरेश मेटिल, सचिन पारखे, गजानन गुरव, रोहित खाडे, आदींच्या पथकाने अटकेची कारवाई केली. 


डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त 


आरोपी पवार बंधूंकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीचे डिजिटल सोनोग्राफी मशीनही पोलिसांनी जप्त केले आहे. मशीन उपलब्ध करुन देण्यात काही डॉक्टर किंवा औषध वितरकांचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आहे. आतापर्यंत दोन सोनोग्राफी मशीन पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पहिले भुदरगड पोलिसांनी जप्त केला असून ते हयात नसलेल्या डॉक्टरकडून विकत घेतल्याची माहिती आहे. या दोन्ही डॉक्टरांचा स्त्री भ्रूणांच्या गर्भपातातही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ताब्यातून गर्भपातासाठी वापरलेली औषधेही जप्त करण्यात आली आहेत.


अन्य एक संशयित डाॅक्टराला अटक 


बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात करण्याऱ्या टोळीतील आणखी एक संशयिताला भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉक्टर आनंद महादेव चौगले (वय 47 वर्षे) असे त्या संशयिताचे नाव आहे. आनंद चौगुले हा बीएचएमएस असून सदलगे गावात दवाखाना आहे. दवाखान्यात आलेल्या गरजू गर्भवती महिलांना या टोळीकडे पाठवत होता. त्याचा या टोळीत सहभाग असल्याचे लक्षात आल्याव सदलगे गावात पथक पाठवण्यात आले होते. रविवारी रात्री आनंदला अटक करुन गारगोटीत आणण्यात आले.


तत्पूर्वी, बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी कर्नाटकातील आणखी एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अनिल मल्लू कुंभार (वय 37 रा.नाईंग्लज, ता. चिकोडी जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. गर्भलिंग निदान प्रकरणात मुख्य संशयित बोगस डॉक्टर विजय कोळस्करसह एजंट, नर्स आणि बोगस डाॅक्टरांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत डॉक्टर बाबुराव दत्तू पाटील (वय 52, रा. बामणे, ता. कागल) सोनाळी येथील सागर शिवाजी बचाटे दिगंबर मारुती किल्लेदार, नर्स शीला शामराव माने (वय 40, दोघेही रा. तिटवे, ता. राधानगरी) सर्जेराव अशोक पाटील आणि हातकणंगले तालुक्यातील रुई येथील अमोल सुर्वे या एजंटना यापूर्वी अटक केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या