Kolhapur Rainगेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात बदलत्या हवामानाचा पाठशिवणीचा खेळ सुरु आहे. कोल्हापूर शहरात दोन दिवस हलक्या सरी कोसळल्यानंतर आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज कोल्हापूरसाठी यलो अलर्ट (IMD issues yellow alert for Kolhapur) देण्यात आला आहे. आज मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, बुधवारपासून पाऊस कमी होईल. तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Continues below advertisement


उत्तर केरळ ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत तयार झालेली चक्रीय स्थिती तसेच 13 डिसेंबरला किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या दोन्ही स्थितीमुळे राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या भागांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाजाने गुर्‍हाळघरे आणि साखर कारखान्यांच्या ऊस तोडणीवर परिणाम झाला आहे. गुर्‍हाळघरांचे जळण भिजण्यासह साखर कारखान्यांची यंत्राद्वारे होणारी ऊसतोड थांबण्याची शक्यता आहे. थंडी कमी झाल्यामुळे साखरेचा उतारा घटण्याचा धोका आहे. ऊसतोड मजुरांच्या टोळ्या पाल्यच्या झोपडीत राहत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. उसात पाणी साचल्याने तेथील तोडण्या थांबल्या आहेत. पावसाचा शिडकावा होत असल्याने ऊस तोडणी मशिनधारक मशिन नेण्यास नकार देत आहेत.


जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी


दुसरीकडे, करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड आणि आजरा तालुक्यात रविवारी हजेरी लावली. शहर परिसरासह तालुक्यात ठिकठिक़ाणी अवकाळी पाऊस झाला. हरभरा, ज्वारी आदी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. मात्र, निवडणुका लागलेल्या गावात प्रचार फेरी, भेटीगाठी सुरू आहेत, पण आज झालेल्या अवकाळी पावसाने रविवार असूनही उत्साहावर पाणी फेरले. भुदरगड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.   


बदलत्या वातावरणाचा ऊस हंगामावर परिणाम 


दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून बदलत्या हवामानाचा जबर फटका ऊसतोड हंगामाला बसला आहे. राज्य सरकारकडून गळीत हंगाम लवकर सुरु करण्यास परवानगी मिळूनही परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने 15 ऑक्टोबरपासून हंगाम सुरु होऊ शकला नाही. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हंगाम सुरु झाल्यानंतर एफआरपीसाठी चालू हंगामात आंदोलने झाली. त्यानंतर दोनवेळा अवकाळी पाऊस झाल्याने ऊसतोडीवर परिणाम झाला. शेतात पाणी साचल्यानंतर ऊसतोडीवर परिणाम होतो. रब्बी पिकांना पाऊस अनुकूल असला, तरी ऊस गळीत मात्र चांगलाच प्रभावित झाला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या