Kolhapur News: महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) इचलकरंजी शहराला नियोजित दुधगंगा नदीतून मंजूर झालेल्या सुळकूड (sulkud) पाणी योजनेला आता कडाडून विरोध होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये नेहमीच कागलच्या राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे सर्वपक्षीय नेते आज मात्र दुधगंगा नदीच्या पाण्यासाठी एकवटल्याचे दिसून आले. इचलकंजीकरांनी पाण्यासाठी आपल्याकडे येऊच नये, अशीच भूमिका वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ यांनी मांडली. सुळकूड पाणी योजनेला मान्यता देण्यात आल्यानंतर इचलकंजी विरुद्ध कागल तालुका संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. 


दूधगंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली आहे. मात्र, या योजनेला सुळकुड परिसरातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला फुटीर अजित पवार गटातून मंत्री झालेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्यासह कागल तालुक्यातील नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकमुखाने इचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध दर्शवला. शिवाय या योजनेच्या कामाला स्थगिती देण्याची सूचना देखील केली.


काळम्मावाडी धरणातील गळतीचा मुद्दा उपस्थित 


या बैठकीमध्ये काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा मुद्दा देखील उपस्थित झाला. काळम्मावाडी धरणाच्या गळतीकडे दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे दूधगंगा नदी काठावरच्या गावांना फटका बसत आहे. कारण हे धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही. धरणाच्या सुरक्षेच्या कारणास्तव पाणीसाठा कमी केला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता इचलकरंजी शहराला कोणत्याही परिस्थितीमध्ये दूधगंगा नदीतून पाणी देणार नाही, अशी भूमिका या सर्व नेत्यांनी मांडली. 


इचलकरंजीमध्ये वाद होण्याची शक्यता 


कागलमधील नेत्यांकडून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी विरोध झाल्यानंतर आता इचलकरंजीमधील नेते काय भूमिका घेणार? याकडे आता लक्ष लागले आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावण्यासाठी पत्र दिले आहे. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी काय भूमिका घेतात? याकडे आता लक्ष आहे.  


आमदार प्रकाश आवाडेंकडून प्रसाद लाड यांना पत्र 


दरम्यान, इचलकरंजीसाठी मंजूर केलेल्या दूधगंगा योजनेबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी आमदार प्रसाद लाड यांना पत्र दिले आहे. या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कागल तालुक्यातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सहकार्य करण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. आमदार प्रसाद लाड हे तिन्ही पक्षांचे समन्वयक आहेत. याबाबत संबंधित नेत्यांना सूचना करण्यात येईल. गरज भासल्यास बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडविण्यात येईल, अशी त्यांनी ग्वाही दिल्याचे आमदार आवाडे यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या