Kolhapur  Crime : कोल्हापूर पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराचा भररस्त्यात पाठलाग करून रविरात्री रात्री निर्घृण खून करण्यात आला. गँगवॉरमधून ही घटना झाल्याचे बोलले जात आहे. कुमार शाहूराज गायकवाड (वय 22, रा. मोरेवाडी, कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. टाकाळा खणीजवळ ही घटना घडली. हल्लेखोरांनी 17 वार करत कुमारचा खून केला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कुमार मामा त्र्यंबक गवळी यांच्याकडे आईसह राहत होता. रविवारी रात्री त्र्यंबक गवळी हे जमिनीच्या व्यवहारानिमित्त ताराराणी चौकात आले असताना कुमारही सोबत होता. याचवेळी हल्लेखोरांनी कावळा नाका परिसरातून  कुमारचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे भीतीने कुमार टेंबलाई उड्डाणपुलापलीकडे गेला. मात्र, टाकाळा येथील खणीजवळ त्याला हल्लेखोरांनी गाठत सपासप वार केले.


कुमार दिसेनासा झाल्याने मामा त्र्यंबक गवळी यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते; पण तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे ते दुचाकीवरून टेंबलाई उड्डाणपुलाखाली आले. त्या ठिकाणी कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी दुचाकीवरूनच त्याला सीपीआरला नेत असतानाच एक रुग्णवाहिका मिळाली. सीपीआरमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


कुमारच्या खूनाची माहिती मिळताच सीपीआर परिसर तसेच राजेंद्रनगरातही मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, मृत कुमारवर  मारामारी, खुनाचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल आहेत. बिंदू चौक सबजेलमधून बाहेर पडतानाचा त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्याने ‘किंग ऑफ कोल्हापूर’ अशा नावाचे एक इन्स्टाग्राम अकाऊंट काढले होते.


एका संशयिताला पोलिसांकडून अटक 


दरम्यान, या प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी अटक  केली आहे. रवी  कांबळे (रा. कनाननगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. सीपीआर परिसरात मृत कुमारचे नातेवाईक जमा आल्यानंतर त्यांनी काही जणांच्या नावांच्या उल्लेख केला होता.  मुख्य संशयित अमर मानेसह चार ते पाच जणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 


दीड महिन्यात दुसऱ्यांदा सराईत गुन्हेगाराचा खून 


यापूर्वी,जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करून गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये 24 सप्टेंबर रोजी घडली होती. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील फरार आरोपी श्रीधर उर्फ दादू बाळकृष्ण पोवारच्या (रा. दौलत नगर, राजारामपुरी कोल्हापूर) मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या