History of the Marathas : शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) आणि भारतीय इतिहास संशोधन परिषद (Indian Council Of Historical Research) यांच्यात सामंजस्य करार झाल्याने मराठ्यांचा स्थानिक इतिहास (History of the Marathas) राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही जाण्याचा मार्ग खुला झाला आहे. या कराराने मराठा इतिहासातील अनेक पैलूंवर सखोल अभ्यास करता येणार असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉ. उमेश कदम यांनी केले. शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय इतिहास संशोधन परिषद यांच्यात सोमवारी सामंजस्य करार झाला. या सामंजस्य करारावर डॉ. कदम यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या.


प्रामुख्याने मराठा इतिहासाच्या विश्वकोशाची निर्मिती (History of the Marathas) करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राहणार आहे. छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीजच्या सामग्री व हस्तलिखित यांच्यावरील अभ्यासासाठी देवाणघेवाण, त्यांचे डिजिटलायझेशन, स्थानिक भाषेवर आधारित मराठा इतिहासावरील 10 मोनोग्राफ प्रकाशित करणे, संशोधन पद्धती तसेच स्त्रोत यांच्यावरील कार्यशाळेचे आयोजन, मराठा इतिहासावरील स्थानिक परिसंवाद, मोठ्या संशोधन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे, ई-लर्निंग कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये सहभागी करणे तसेच ऑनलाईन व्याख्यानांची मालिका, मराठी भाषा आणि मोडी लिपी ऐतिहासिक अर्थाने समजून घेणे आदी उपक्रम या अंतर्गत होणार आहेत.


दरम्यान, डॉ. कदम म्हणाले, शिवाजी विद्यापीठ माझी मातृसंस्था आहे. या संस्थेसमवेत हा महत्त्वपूर्ण करार करत असताना अभिमान वाटतो. मराठा इतिहास हा भारताचा मूळ इतिहास आहे. मात्र, तो परकियांनी आपल्याला सांगितला. मोडी, मराठीसह विविध स्थानिक भाषांमध्ये अद्यापही पुष्कळ इतिहास दडलेला आहे. या करारांतर्गत या इतिहासाचे संशोधन करण्यात येणार आहे. त्यांचे डिजिटलायझेशन करून तो सर्वांना उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे आजादी का अमृतमहोत्सवच्या निमित्ताने येत्या फेब्रुवारीअखेरपर्यंत स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या अनुषंगाने तीन व्याख्याने आयोजित करण्यात येतील. मराठा इतिहास आणि स्थानिक स्रोत-साधने या अनुषंगानेही दहा व्याख्याने आयोजित करण्यात येतील. काही महत्त्वाच्या मराठी ग्रंथांचा अनुवाद करून त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यावयाचे असेल, तर तसे प्रस्ताव सादर करण्याचीही संधी करारामध्ये असेल. या उपक्रमांसाठी प्राथमिक टप्प्यावर 15 लाख रुपयांची तरतूदही करण्यात येईल.’


कुलगुरू डॉ. शिर्के यावेळी बोलताना म्हणाले की, ‘भारतीय इतिहास संशोधन परिषदेसमवेत (Indian Council Of Historical Research) होणारा विद्यापीठाचा हा पहिला सामंजस्य करार आहे. मराठा इतिहास जागतिक स्तरावर नेण्याची ही खूप महत्त्वाची संधी आहे. त्यासाठी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि मराठा इतिहास संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून ऐतिहासिक साधने व दस्तावेज संस्थेला उपलब्ध करून देण्यात येतील.’


इतर महत्वाच्या बातम्या